Home Cities जळगाव बुधवारी NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात जळगावात महाविकास आघाडीच्या युवक संघटनांचे आंदोलन

बुधवारी NEET पेपरफुटी प्रकरणाविरोधात जळगावात महाविकास आघाडीच्या युवक संघटनांचे आंदोलन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । देशभर गाजत असलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जळगावात महाविकास आघाडीच्या युवक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. युवासेना, युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, दि. २० मे रोजी सकाळी ११ वाजता एम. जे. कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनातून पेपरफुटी प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर आणि निष्पक्ष कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे.

NEET परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुण्यातील मॉडर्न कॉलेजमधील एका महिला प्राध्यापिकेला या प्रकरणात अटक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तसेच या गैरप्रकारामागे संघटित रॅकेट किंवा इतर व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने शिक्षण क्षेत्रातील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

महाविकास आघाडीच्या युवक संघटनांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर या प्रकारामुळे मोठा अन्याय होत आहे. पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत होत असून शासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य भावना शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी हे आंदोलन लोकशाही मार्गाने करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

या आंदोलनासाठी युवासेनेचे विराज कावडीया, निलेश चौधरी, पियुष गांधी आणि प्रीतम शिंदे, युवक काँग्रेसचे मुजीब पटेल तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विनायक पाटील आणि रिकु चौधरी यांनी पुढाकार घेतला आहे.  विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर विषयात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही आयोजकांनी केले आहे.


Protected Content

Play sound