सावदा ता. रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | इन्स्ट्रुमेंटल ट्रेनिंग सेंटर, भुसावळ आणि रसायनशास्त्र विभाग, धनाजी नाना महाविद्यालय, फैजपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ऍनालिटिकल इन्स्ट्रुमेंटल स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम या विषयावर पंधरा दिवसीय विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार मा. श्री शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शिरीषदादा चौधरी म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रात उपलब्ध उपकरणे हाताळण्याचे कौशल्य अवगत असल्यास नोकरी मिळवणे सोपे होते. पुस्तकी ज्ञानासोबतच प्रात्यक्षिक कौशल्य व उपकरण हाताळण्याचे ज्ञान असणे ही काळाची गरज आहे.” या शिबिरामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
या शिबिरात यु.व्ही., आय.आर., एचपीएलसी, व जी.सी. या अत्याधुनिक उपकरणांचे हँडस-ऑन ट्रेनिंग एम.एससी. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. ही सर्व उपकरणे केमिकल आणि औषधनिर्माण उद्योगात विश्लेषण प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघुळदे होते. त्यांनी श्री अनुप बेंडाळे यांचे आभार मानत सांगितले की, “ही सुविधा आमच्या महाविद्यालयात उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांना शहरात जाऊन खर्चिक कोर्स करण्याची गरज भासणार नाही आणि त्यांना कमी खर्चातच उच्च प्रतीचे प्रशिक्षण मिळेल.”
यावेळी माजी प्राचार्य व कार्यकारी मंडळ सदस्य डॉ. एस. एस. पाटील, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप बी. तायडे, प्रा. डॉ. ए. के. पाटील, डॉ. राकेश डी. तळेले, डॉ. योगेश तायडे, प्रा. एस. के. पाडवी, डॉ. एच. आर. तळेले, डॉ. पल्लवी भंगाळे, डॉ. एम.बी. पाटील, प्रा. निलेश पाटील, प्रा. हंशाली महाजन, प्रा. पूजा महाजन, प्रा. चैताली पाटील, प्रा. सुजित भाट, श्री ज्ञानदेव चव्हाण, श्री जितेंद्र चौधरी, श्री अरुण सैंदाणे व स्वप्निल हिवरे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. दिलीप बी. तायडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.