कंगनाचा पद्मश्री काढून घ्या : नवाब मलीक

मुंबई प्रतिनिधी | अभिनेत्री कंगना राणावत हिने लक्षावधी स्वातंत्र्यसैनिकांचा अवमान केला असून तिला नुकताच प्रदान करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्यात यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी केली आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने भारताला १९४७ साली भीक मिळाली होती, तर २०१४ साली खरे स्वातंत्र मिळाल्याचे वक्तव्य नुकतेच एका मुलाखतीत केले असून यावरून तिच्यावर टिका होत आहे. या अनुषंगाने आज राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी तिच्यावर टिकास्त्र सोडले आहे.

नवाब मलीक म्हणाले की, १८५७ पासून या देशात स्वातंत्र्याचं आंदोलन सुरू झालं. त्यानंतर लाखो लोकांनी प्राणाची आहुती दिली. गांधींनी मोठा लढा दिला. शेवटी ब्रिटीशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. त्यानंतर एक अभिनेत्री मलाणा क्रिम घेऊन ओव्हर डोस झाल्यावर काही तरी बोलत आहे. त्यामुळे त्यांचा पद्मश्री मागे घेतला जावा. या अभिनेत्रीने कोरोडो भारतवासियांचा अपमान केला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली.

दरम्यान, मलीक यांनी फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याने मंदिराच्या जमिनीचा घोटाळा केला होता. त्याचे पुरावे मी लवकरच देणार आहे. भाजपवाले कसे घोटाळे करत होते हे राज्यातील जनतेला दिसेल, असं त्यांनी सांगितलं.

Protected Content