बारामतीकरांचे राज्य संपलेय ! : शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बारामतीकरांचे राज्य संपलेय हे ध्यानात घ्या आणि नीट वागा असा इशारा एकनाथ शिंदे यांचे समर्थक कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना दिला आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी एकीकडे उध्दव ठाकरे यांचा गट तर दुसरीकडे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर जोरदार हल्ला चढविला असल्याचे दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांवर शिंदे समर्थक कडाडून टीका करत आहेत. यातच एकनाथ शिंदे यांचे समर्थक तथा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी आता राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिलेल्या इशार्‍याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.

महेश शिंदे म्हणाले की, उसाची आडवा-आडवी जिरवा-जिरवी करू नका. आता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सामान्य जनतेचं, शेतकर्‍यांचं राज्य आलय. आता बारामतीकरांचं राज्य संपलंय. हे ध्यानात घ्या आणि नीट वागा, असा इशाराही महेश शिंदे यांनी दिला आहे. यावर आता राष्ट्रवादीकडून काय उत्तर येणार ? याची उत्सुकता लागली आहे.

Protected Content