सातपुड्याच्या कुशीत आरोग्यदायी वनभोजनाने निसर्गप्रेमी तृप्त

बुलढाणा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या सालईबन येथे रानभाजी खाद्य उत्सवामध्ये शेकडो निसर्गप्रेमींनी रानभाज्यांपासून बनविलेल्या आरोग्यदायी पाककृतींच्या वनभोजनाचा आनंद घेतला.

आज सकाळी १० ते सायंकाळी ४ पर्यंत विविध रानभाजी पूरक उपक्रमांनी हा सोहळा पार पडला. समोर पसरलेला विस्तीर्ण सातपुडा डोंगर, सर्वत्र हिरवंगार वातावरण,  अधूनमधून येणाऱ्या श्रावणसरी अशा वातावरणात इच्छुकांनी पाककृतींचा मनमुरादपणे आस्वाद घेतला. 

तरुणाई फाउंडेशन खामगाव, बुलढाणा वनविभाग, महात्मा गांधी लोकसेवा संघ, गो. से. मंहाविद्यालय खामगाव, सुनगाव ग्रामपंचायत, जळगाव जा. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक) कार्यालय यांच्या संयुक्तपणे या रानभाजी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळी रानभाज्यांच्या आगळ्या चवी चाखता याव्या, रानभाज्यांचं संवर्धन व्हावं, रोजच्या आहारात असलेल्या विषयुक्त भाज्यांची माहिती व्हावी, पिढीजात संक्रमित होणारे हे लोकविज्ञान आपल्या विस्मरणात जाऊ नये आणि कमी होत चाललेल्या जंगल क्षेत्रातून या वनस्पती कायमच्या नाहीशा होऊ नये या उद्देशाने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. जेनेटिकली मॉडिफाइड व संकरित बियाणी व विकसित वाणांच्या गर्दीत आपलं देशी बियाणं हरवू नये, तसेच रानमेव्याला लोकप्रियता, राजमान्यता व  प्रचार – प्रसार करण्यासाठी हा उपक्रम घेतला जातो.

आज सकाळी १० ते १२ या उदघाटन सत्रात शासनाच्या महाराष्ट्र जैव विविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील, ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते व सेंद्रिय शेतकरी वसंतभाऊ फुटाणे यांनी रानभाजी या विषयावर मार्गदर्शन केले. शीतल पडोळ यांनी रानभाज्यांची पाककृती व ओळख करून दिली. यावेळी सुप्रसिद्ध मराठी गझलकार पं. भीमराव पांचाळे,  गो. से. महाविद्यलयाचे प्राचार्य धनंजय तळवणकर, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष नारायण पिठोरे पाटील यांची उपस्थिती होती. संचलन अरविंद शिंगाडे तर प्रास्ताविक तरुणाईचे सहसचिव उमाकांत कांडेकर यांनी केले. 

रानभाजी प्रदर्शनीमध्ये आदिवासी महिलांनी गोळा केलेल्या सातपुडयातील पावसाळी रानभाज्या पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या होत्या. त्यासोबत रानभाजी विषयावरील पुस्तके उपलब्ध होती. गवती चहापासून बनविला काढा, अंबाडी सरबत हे पेय येथे ठेवण्यात आले होते.

त्यानंतर रानभाज्यांपासून बनविलेल्या २२ पाककृतीचा आस्वाद उपस्थितांनी घेतला. यात विभागाचे आमदार व माजी मंत्री डॉ. संजय कुटे, आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, जि. प. सदस्या रुपाली अशोक काळपांडे, जीएसटी कमिशनर  टी.के.पाचरने, रेंज फॉरेस्ट ऑफिसर किशोर पडोळ, ठाणेदार सुनिल अंबुलकर   यांच्यासह जिल्ह्यातील अनेक प्रतिष्ठित रानभाजी प्रेमी उपस्थित होते. 

मुख्य वस्तीपासून डोंगरात हा सोहळा ठेवण्यात आला असल्याने मर्यादित संख्येत व सहयोग निधी घेऊन रानभाजीचे वनभोजन देण्यात आले होते. वेळेवर शेकडो लोकांनी प्रवेशासाठी इच्छा प्रदर्शित केली होती; मात्र व्यवस्था अपुरी पडत असल्याने शक्य झाले नाही. ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या व्यक्तींनाच याचा लाभ घेता आला. बऱ्याच लोकांना माघारी जावे लागले.

इतर अनेक ठिकाणी रानभाजी उत्सव घेतले जातात; मात्र तेथे फक्त प्रदर्शन व माहिती दिली जाते. मात्र सालईबनातील उत्सवाचे वैशिष्टये असे की फक्त माहितीच नव्हे तर पाककृती सांगीतली जाते व सर्व पाककृती या तरुणाई फाउंडेशनच्या महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या हाताने बनवून उपस्थितांना खाऊ घातल्या जातात. त्यामुळे या उत्सवाला येण्यासाठी मोठ्या संखेने लोकं आतुर असतात.

Protected Content