मका खरेदी करून व्यापाऱ्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील महिंदळे येथील काही शेतकऱ्यांकडून मका खरेदी करून १० दिवसात पैसे देतो असे सांगून दोन लाख 39 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील महिंदळे येथील शेतकरी अरुण बारकू पाटील (वय 62) हे शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी व त्यांचे गावातील इतर शेतकऱ्यांनी २ लाख ३९ हजार रुपये किमतीचा १२४ क्विंटल मका भडगाव शहरातील योगेश ट्रेडरचे मालक योगेश लक्ष्मण सोनजे रा. खोल गल्ली, भडगाव याला विकला होता. योगेश सोनजे याने १० दिवसात मक्याची रक्कम परत देतो, असे सांगून मका खरेदी केलेला होता. त्यानंतर १० दिवस होऊनही योगेशने पैसे दिले नाही, म्हणून शेतकरी अरुण पाटील यांनी पैशांची मागणी केली. योगेशने पैसे न देता उडवाउडवीची उत्तरे देवून फसवणूक केली.
याप्रकरणी अरुण बारकू पाटील यांनी बुधवारी २७ जूलै रोजी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून व्यापारी योगेश लक्ष्मण सोनाजी रा. खोल गल्ली, भडगाव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर पालकर करीत आहे.

Protected Content