मालेगावात हजर न होणारे जळगावचे दोन पोलीस कर्मचारी निलंबित

जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मालेगाव शहरात बंदोबस्तावर नियुक्त असतांना हजर न होता, परस्पर दांडी मारणार्‍या जिल्हा मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी निलंबित केले आहे. अशी माहिती विश्वसनिय सुत्रांकडून मिळाली. सोनजी सुभाष कोळी व महेंद्र प्रकाश शिंपी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. गेल्या आठवड्यात मालेगावात गैरहजर असलेल्या तीन पोलीस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे.

जळगाव जिल्हयातुन मालेगाव येथे ११० पोलीस कर्मचारी बंदोबस्ताकरीता पाठविण्यात आले होते. त्यापैकी जिल्हा मुख्यालयात नेमणुकीस असलेले सोनजी कोळी व महेंद्र शिंपी हे दोघे नेमुन दिलेल्या कर्तव्याचे ठिकाणी हजर न झाल्याने गैरहजर आढळून आले. संबंधित कर्मचार्‍यांचा रिपोर्ट पोलीस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी याबाबत अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांना चौकशीच्या सुचना केल्या आहेत. त्यानुसार त्यांनी सोनजी कोळी, व महेंद्र शिंपी या दोघांची चौकशी करुन त्याचा अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार डॉ. पंजाबराव उगले यांनी दोघांना निलंबित केले असल्याची माहिती मिळाली आहे.

गेल्या आठवड्यात तीन निलंबित
मालेगाव बंदोबस्ताच्या ठिकाणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे कॉ. सुरेश रुपा पवार, मुख्यालयाचे प्रसाद सुरेश जोशी व परवेझ रईस शेख,  जळगाव मुख्यालयाचे सोनजी सुभाष कोळी हे पोलीस कर्मचारी मालेगाव येथे ठिकाणी गैरहजर आढळून आले. तसेच वरिष्ठांची परवानगी न घेताच जळगावात प्रवेश केला होता. अपर पोलीस अधीक्षकांनी चौकशी करुन अहवाल पोलीस अधीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार पोलीस अधीक्षकांनी २५ एप्रिल रोजी सुरेश पवार, प्रसाद जोशी व परवेझ रईस शेख यांना निलंबित केले होते.

Protected Content