उत्तर देण्याची हिम्मत शिवसेना नेत्यांमध्ये नाही

 

मुंबई : वृत्तसंस्था । भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलेल्या आव्हानाला उत्तर दिलं आहे. या घोटाळ्यावर उत्तर देण्याची शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांमध्ये हिंमत नसल्याचं म्हटलं आहे. यावेळीही त्यांनी अनेक गंभीर आऱोप केले आहेत.

किरीट सोमय्या यांनी अन्वय नाईक कुटुंबासोबत ठाकरे सरकारने जमीन व्यवहार केल्याचा दावा करत अनेक गंभीर आरोप केले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना वॉर्निंग दिली.

“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड करण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“पुराव्यांशिवाय मी बोलत नाही हे मला शिवसेनेच्या नेत्यांना सांगायचं आहे. तुमच्यामध्ये उत्तर देण्याची हिंमत नाही, म्हणून शिवीगाळ करता. दहिसर घोटाळ्याची सगळी कागदपत्रं असून मुंबई लोकायुक्तांकडे तक्रार दिली आहे. ती दाखलही झाली आहे,” असं किरीट सोमय्या यांनी यावेळी सांगितलं.

“ठाकरे सरकार घोटाळेबाज सरकार आहे. हिंमत असेल तर ठाकरे सरकारच्या कोणत्याही प्रवक्त्याने किरीट सोमय्याशी बोलावं. ही भाषा, हे संस्कार त्यांचे आहेत. मला त्यांच्या भाषेत, संस्कारात पडायचं नाही,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे

. “मी आणखी नऊ सातबारा उतारे सादर करत आहेत. परवा एक सातबारा दिला तर लोक मला येऊन माहिती देतात, अधिकारी देत नाहीत. ३० जमिनीचे व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आणखी माहिती हवी असेल तर देतो. एकंदर ठाकरे परिवाराचे ४० जमीन व्यवहार झाले आहेत त्यापैकी ३० अन्वय नाईक कुटुंबासोबत आहेत,” असा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे.

“मी उद्धव ठाकरेंना फक्त पाच प्रश्न विचारले आहेत त्यातील एकाचं तरी उत्तर द्या. महाराष्ट्राच्या जनतेला माहिती हवी आहे. शिवसेनेत हिंमत नाही म्हणून विषय वळवत आहेत. अल्पेश अजमेराकडून २ कोटी ५५ लाखांची जमीन संजय राऊत तुमची महापालिका ९०० कोटीत घेते. जे मूळ मुद्दे आहेत ते टाळू नका,” असं प्रत्युत्तर किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

मुंबईच्या महापौरांनी हेराफेरी केली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला . “सातत्याने ठाकरे सरकारकडे पाठपुरावा केल्यानंतरही एसआरए, मुंबई पोलिसांनी महापौरांवर कारवाई केली नाही. महापौरांनी बनावट सही करत करार केला. कागदपत्रं पोलीस ठाण्यात सादर करुन तक्रार केल्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. काल मुंबई उच्च न्यायालयात किशोरी पेडणेकर, ठाकरे सरकार, मुंबई महापालिका आणि एसआरएच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. दिवाळीनंतर याच्यावर सुनावणी होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

“पाच हजार बेडच्या कोव्हिड हॉस्पिटलच्या नावानेही घोटाळा झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी मला कानात सांगितल्याचं महापौरांचं लेखी म्हणणं आहे. त्यासाठी १२ हजार कोटींचा प्रोजेक्ट घेऊन पालिका धावत सुटली. तीन हजार कोटींची जमीन ठाकरे सरकारच्या कौटुंबिक मित्र बिल्डरकडून घेण्याचा घोटाळा पूर्ण केला. ही तक्रार राज्यपालांकडे दिली होती. राज्यपालांनी त्यांच्याकडील अधिकारांतर्गत लोकायुक्तांना तपास करण्याचे निर्देश दिले आहेत,” अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबरला आणखी तीन घोटाळ्यांची कायदेशीर कारवाई सुरु करणार. मुंबई हायकोर्टात दोन जनहित याचिका आणि एक लोकायुक्तांकडे दाखल होणार आहे,” असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

Protected Content