उदय सामंत व यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बंडखोरी केलेल्या दोन नेत्यांच्या विरोधात शिवसेनेने आज कारवाई केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडून वेगळी वाट निवडल्याने उध्दव ठाकरे यांचे सरकार गडगडले. यानंतर झालेल्या नाट्यमय घटनांमधून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदी आरूढ झाले असून फडणवीस उपमुख्यमंत्री बनले आहेत. दरम्यान, पहिल्यांदा शिवसेनेतर्फे मोजक्या नेत्यांवर हकालपट्टीची कारवाई करण्यात आली. यात प्रामुख्याने नेते परत येऊ शकतात असा विश्‍वास असल्याने ही कारवाई अगदी संथपणे करण्यात आली. आज देखील पक्षाने बहुतांश आमदारांना निलंबीत केलेले नाही. मात्र आता हळूहळू या कारवाईला वेग येणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. या अनुषंगाने मंत्री उदय सामंत आणि मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती यशवंत जाधव यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला आहे.

पक्षाच्या विरोधात कारवाया केल्याबद्दल उदय सामंत आणि यशवंत जाधव यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे जाहीर करण्यात आले आहे. यातील उदय सामंत हे कोकणातील मातब्बर नेते असून ते ठाकरे आणि आता शिंदे या दोन्ही सरकारमध्ये मंत्री आहेत. तर यशवंत जाधव हे देखील मुंबईतले वजनदार नेते मानले जातात. महापालिकेत त्यांची ताकद आहे. तर त्यांच्या सौभाग्यवती या शिवसेनेच्या आमदार आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधी यशवंत जाधव यांच्यावर करण्यात आलेली कारवाई लक्षणीय मानली जात आहे. तर उदय सामंत यांच्यावरील कारवाईच्या नंतर इतर मंत्री आणि आमदारांनाही शिवसेनेतून काढण्यात येणार का ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content