‘ऑस्कर’मध्ये भारताचा झेंडा : एलीफंट व्हिस्परर्स सोबत नाटू-नाटूची धुम !

लॉसएंजल्स-वृत्तसंस्था | संपूर्ण जगात मानाचे समजल्या जाणार्‍या ऑस्कर पुरस्कारांमध्ये भारतीय माहितीपटासह गाण्याला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.

आज लॉसएंजल्स शहरात अकॅडमी अवॉर्ड अर्थात ऑस्करचे वितरण करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता निर्माण झाली होती. यात एलीफंट व्हिस्पर्स या भारतीय माहितीपटाला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी या वर्गीवारीत ऑस्कर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. अचित जैन, गुनीत मोंगा निर्मित आणि कार्तिकी गोन्साल्विस दिग्दर्शित हा लघुपट ४१ मिनिटांचा आहे. या लघुपटात तमिळनाडूच्या मुदुमलाई व्याघ्र प्रकल्पातील एका कुटुंबाची कथा अधोरेखित करण्यात आली आहे. दोन अनाथ हत्तींना हे कुटुंब दत्तक घेतं. याचीच भावकथा यात रेखाटण्यात आलेली आहे. या माहितीपटाला पुरस्कार मिळाल्यानंतर कार्तिकी गोन्साल्विस आणि गुनीत मोंगा यांनी मंचावर हा पुरस्कार स्वीकारला. ‘माझी मातृभूमी, भारताला मी हा पुरस्कार समर्पित करत आहे’, असं दिग्दर्शिका कार्तिकी यावेळी म्हणाल्या.

दरम्यान, यासोबत राजामौली यांच्या आरआरआऱ चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला ’बेस्ट ओरिजनल सॉंग’ कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाले होते. त्याच्या शर्यतीत तगडे स्पर्धक होते. त्यात हॉलीवूडच्या लोकप्रिय चित्रपटांचाही समावेश होता. यामुळे यात वर्गवारीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तथापि, या सर्व गाण्यांना मागे टाकून नाटू-नाटू या गाण्याने ऑस्कर पुरस्कार पटकावला. एकाच वर्षी दोन भारतीय कलाकृतींना पुरस्कर मिळण्याचा अनोखा योग यंदा जुळून आला आहे.

Protected Content