“गाव तेथे राष्ट्रवादी” संकल्पना; पदाधिकाऱ्यांनी सुप्रिया सुळेंची घेतली भेट


धरणगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी २७ जून रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. यावेळी “गाव तेथे राष्ट्रवादी” या संकल्पनेच्या पोस्टरचे अनावरण सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नुकतेच धरणगाव शहरात मुख्यमंत्री आले असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार गावागावात पोहोचवण्यासाठी “गाव तेथे राष्ट्रवादी” ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा धरणगावातील पदाधिकाऱ्यांचा उद्देश आहे.

या भेटीदरम्यान, धरणगाव तालुका आणि जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात पक्षाची संघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सर्व निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी सांगितले. खासदार सुप्रिया सुळे यांनीही संघटनेच्या बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आणि आगामी निवडणुकांच्या निमित्ताने लवकरच जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याचे आश्वासन दिले.

पुढील टप्प्यात जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य कार्यकर्त्यांना घेऊन बारामती अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने पवार साहेबांची भेट घेण्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला. या महत्त्वपूर्ण भेटीप्रसंगी माजी युवती जिल्हाध्यक्षा कल्पिता पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सोनवदचे माजी सरपंच तथा पक्षाचे जेष्ठ पदाधिकारी बाळासाहेब पाटील, माजी सरपंच उज्वल पाटील, प्रगतीशील शेतकरी हितेंद्र पाटील, आणि धरणगाव शहराध्यक्ष लक्ष्मणराव पाटील हे उपस्थित होते.