सावकारी पिळवणूक थांबणार !, सावकारांना व्याजदर फलक लावणे अनिवार्य


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावकारांकडून होणारी शेतकऱ्यांची आणि इतर कर्जदारांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. “महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, २०१४” नुसार, जिल्ह्यातील सर्व परवानाधारक सावकारांना त्यांच्या व्यावसायिक ठिकाणी व्याजदराची स्पष्ट माहिती देणारा फलक लावणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.

या नियमावलीनुसार, लावण्यात येणाऱ्या फलकावर सावकाराचे नाव, परवाना क्रमांक, कार्यक्षेत्र, परवाना जारी करणाऱ्या कार्यालयाचे नाव आणि विविध प्रकारच्या कर्जांवर आकारण्यात येणारे व्याजदर याची सविस्तर माहिती ठळकपणे नमूद करावी लागणार आहे. हा फलक सावकारी व्यवसायाच्या दर्शनी भागात लावण्याच्या स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत, जेणेकरून कर्जदारांना व्याजदराची माहिती सहजपणे उपलब्ध होईल.

शासनाने सावकारीसाठी व्याजदराची मर्यादा देखील निश्चित केली आहे. शेतकऱ्यांसाठी तारण कर्जावर जास्तीत जास्त ९ टक्के तर विनातारण कर्जावर १२ टक्के प्रतिवर्ष व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतर व्यक्तींसाठी तारण कर्जावर १५ टक्के आणि विनातारण कर्जासाठी १८ टक्के अधिकतम व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत. हे सर्व नियम परवानाधारक सावकारांना बंधनकारक असून, या नियमांमुळे कर्जदारांची फसवणूक टाळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.