सामाजिक न्याय दिन’ निमित्त शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने ‘सामाजिक न्याय दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अँटी करप्शन मानव अधिकार सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भाजपा अनुजाती मोर्चा राज्य सचिव प्रा. संजय मोरे यांनी भूषवले. तर प्रमुख विशेष अतिथी म्हणून माजी उपनगराध्यक्ष प्रमोद नेमाडे उपस्थित होते.

प्रा. संजय मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. प्रा. मोरे आणि प्रमोद नेमाडे यांनी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याला सामाजिक समतेचा संदेश दिला. त्यांचे सामाजिक न्याय धोरण दीनदलित आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरले. महाराजांनी समाजासमोर एका आदर्श राज्यकर्त्याचे उदाहरण ठेवले. त्यांनी जाती-पातीच्या पलीकडे जाऊन माणुसकीचा विचार मांडला. संपूर्ण महाराष्ट्राला समानतेचा अधिकार देऊन, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी अनमोल विचार दिले. छत्रपती शाहू महाराज हे खऱ्या अर्थाने दिनदलित बहुजनांचे कैवारी होते, असे प्रा. मोरे यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला इंजि. पुरुषोत्तम ठाकूर, डॉ. संदीप गाढे, डॉ. महेंद्र सुरवाडे, प्रा. अनिल सपकाळे, मयुर कोळी, जगदीश बैरागी, प्रा. दीपक महाजन, दिलीप खर्चे, निलेश पाटील, सुनील पाटील, विजय सुरवाडे, शेखर देशमुख, प्रा. सुनील तायडे यांच्यासह अनेक युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनराज बावस्कर यांनी केले, तर आभार दिगंबर चौधरी यांनी मानले. या कार्यक्रमातून छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचे आणि त्यांच्या दूरदृष्टीचे स्मरण करण्यात आले.