पूर्व वैमनस्यातून खून : दोघे पोलिसांच्या ताब्यात

जळगाव प्रतिनिधी | जामीन मिळाल्यानंतर घरी परतणार्‍यांवर टोळक्याने केलेल्या हल्ल्यात एक ठार तर एक जखमी झाल्याने प्रचंड खळबळ उडालेली असतांनाच आता पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

याबाबत वृत्त असे की, आज सायंकाळी सहाच्या सुमारास नशिराबाद येथील उड्डाण पुलाच्या खालील बाजूस दुचाकीस्वारांवर गोळीबारासह चॉपरने हल्ला करण्यात आला. यातील तरूण जागीच ठार झाला असून त्याचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच नशिराबाद पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या हल्ल्यात धम्मप्रिय मनोहर सुरळकर ( वय २०) याचा मृत्यू झाला असून त्याचे वडील मनोहर सुरळकर जखमी झाले आहेत. खून झाल्यानंतर केलेल्या चौकशीत याला पूर्व वैमनस्याची किनार असल्याचे दिसून आले.

भुसावळ येथील कैफ शेख जाकीर या तरुणाचा ११ ऑक्टोबर २०२० रोजी खून झाला होता. या खून प्रकरणात धम्मप्रिया मनोहर सुरळकर याला अटक करण्यात आली होती. सुमारे अकरा महिन्यापासून तो जळगाव कारागृहात होता. आज धम्मप्रिया याचा जामीन न्यायालयाने मंजुर केला. त्याचे वडील मनोहर आत्माराम सुरळकर हे मुलास घेण्यासाठी जळगावला गेले होते. सायंकाळी हे पिता-पुत्र भुसावळकडे येण्यासाठी निघाले.

नशिराबाद उड्डाणपुलाच्या खालील बाजूस हे बाप-लेक आले असतांना एका टोळक्याने त्यांना अडवून त्यांच्यावर हल्ला केला. याप्रसंगी झालेल्या गोळीबारात धम्मप्रिय हा जागीच ठार झाला. तर त्याचे वडील मनोहर सुरळकर हे गंभीर जखमी झाले. भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठून चौकशी सुरू केली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून दोघांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरूणांची नावे समीर आणि जाकीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अटक करण्यात आलेल्यांची कसून तपासणी करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. तर शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content