राज्यसभा पोट निवडणुकीत भाजपचे ‘ते’ निलंबीत आमदार मतदार करू शकणार !

मुंबई प्रतिनिधी | विधीमंडळात गोंधळ केल्यामुळे निलंबीत झालेले भाजपचे १२ आमदार हे राज्यसभा पोट निवडणुकीत मतदान करू शकतील असा महत्वाचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे. यात माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे.

राज्यात विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी व विरोधक समोरा-समोर आले होते. यासोबत अध्यक्षांच्या दालनाबाहेर विरोधक व सत्ताधार्‍यांमध्ये धक्काबुक्की देखील झाली होती. यावरू भाजपाच्या १२ आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आले होते. दरम्यान, या भाजपाच्या निलंबित १२ आमदारांना  निवडणूक आयोगाने दिलासा दिला आहे.

कॉंग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी राज्यात पोटनिवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली होती. ४ ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे.  या पोटनिवडणूकीत भाजपाचे निलंबित बारा आमदार देखील मतदान करु शकणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाने १७ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र विधिमंडळ प्रशासनाला भाजपाच्या निलंबित बारा सदस्यांसाठी मुंबईतील विधान भवनाच्या परिसराबाहेर मतदानासाठी स्वतंत्र बूथ स्टेशनची तरतूद करण्याचे निर्देश दिले आहेत.

निलंबित असल्यामुळे १२ आमदार विधान भवनाच्या परिसरात येऊ शकत नाही. त्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूकीत मतदान करण्यासाठी त्यांची वेगळी व्यवस्था सरकारला करावी लागणार आहे. दरम्यान, निलंबीत १२ आमदारांमध्ये माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांचा समावेश असल्याने ते सुध्दा आता राज्यसभा पोट निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत.

 

Protected Content