यवतमाळ प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने खोटे बोलतात. मोदी ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी खोटे बोलतात, अशी बोचरी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी यवतमाळ येथील प्रचार सभेत केली. तसेच सामान्यांच्या बँक खात्यात ना १५ लाख रुपये आले आणि ना 6 हजार रुपये जमा झाले. मागील निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवरून राहुल गांधींनी लक्ष्य केलं.
यावेळी त्यांनी शेतकरी आत्महत्या, वाढती बेरोजगारी आदी मुद्द्यांवर भर दिला. लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाच्या खात्यात 6 हजार रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याआधीच्या निवडणुकीत प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. तुमच्या बँक खात्यात पंधरा लाख रुपये किंवा सहा हजार रुपये जमा झाले का? असा सवाल राहुल गांधी यांनी केला. जेथे-जेथे मोदी जातात. तिथे ते खोटे बोलतात, असा आरोपही त्यांनी केला. मोदी कधी चंद्रावर बोलतात. कधी जम्मू-काश्मीर, तर कधी कलम ३७० वर बोलतात. कधी कार्बेट पार्कात जाऊन चित्रपट बनवण्याची भाषा करतात. पण तुमच्यासमोरील मुद्दे, शेतकऱ्यांच्या समस्या, बेरोजगार शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चकार शब्दही काढत नाहीत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ होईल असे आश्वासन त्यांनी दिले होते. पण ते मिळालं का, असा सवालही राहुल यांनी उपस्थितांना केला.