गोमूत्र शिंपडा, नाही तर प्या ! : नारायण राणेंचा हल्लाबोल

मुंबई प्रतिनिधी | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला भेट दिल्यानंतर शिवसैनिकांनी शुध्दीकरण केल्यावरून त्यांनी आज गोमूत्र शिंपडा, नाही तर प्या ! असे सांगत जोरदार हल्लाबोल केला आहे.

भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवेळी सूक्ष्म व लघु-मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळाला भेट दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी शिवसैनिकांनी या स्मृतीस्थळाचे शुद्धिकरण केले. त्यानंतर नारायण राणे यांनी याविषयी आपल्या पत्रकार परिषदेत भाष्य करत जोरदार टीका केली आहे.

याप्रसंगी नारायण राणे म्हणाले की, काल आम्ही सावरकर स्मारक आणि शिवाजी पार्कवरील बाळासाहेब ठाकरे स्मृती स्थळाचंही दर्शन घेतलं. साहेब, आशीर्वाद द्यायला तुम्ही आज हवे होतात. साहेब, आशीर्वाद द्या मला यशस्वी होऊ दे, एवढंच वाक्य म्हणालो. आणि पुढे ही यात्रा निघाली, असं राणे म्हणाले. तर, शिवसैनिकांच्या कथित शुध्दीकरणावरही त्यांनी भाष्य केले. मला कोणासमोर नतमस्तक व्हावंसं वाटतं, नमस्कार करावासा वाटतो हा माझा प्रश्न आहे. आता त्यात गोमूत्र कोणाला शिंपडायचं शिंपडू द्या, कोणाला प्यायचं त्याला पिऊ द्या. त्यात माझा काय संबंध? मला काय विचारता, त्यांना विचारा ना की का शिंपडलं? काय दूषित झालं होतं? असा प्रश्‍न राणेंनी विचारला.

Protected Content