मंदाताई खडसे यांना हजेरीतून सूट : २१ रोजी होणार जामीनावर सुनावणी

मुंबई प्रतिनिधी | भोसरी येथील वादग्रस्त भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या सौभाग्यवती मंदाताई खडसे यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या कार्यालयात हजेरी लावण्यापासून उच्च न्यायायालाने सूट दिली असून त्यांच्या जामीनावर आता २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

या संदर्भात वृत्त असे की, भोसरी येथील भूखंड प्रकरणात माजी मंत्री एकनाथराव खडसे, त्यांच्या पत्नी मंदाताई आणि जावई गिरीश दयाराम चौधरी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात गिरीश चौधरी यांना ५ जुलै पासून ईडीने अटक केली असून ते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. तर एकनाथराव खडसे यांना जामीन मिळालेला आहे. दरम्यान, मंदाताई खडसे यांचा चौकशीसाठी आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवसाला हजेरी लावण्याची अट न्यायालयाने टाकली होती. या संदर्भात उच्च न्यायालयाने आज ही अट काढून टाकली आहे. अर्थात, आता मंदाताई खडसे यांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, कोर्टाने आपल्या निर्देशात मंदाताई खडसे यांची चौकशी करायची असेल तर २४ तास आधी पूर्वसूचना देण्याचे निर्देश दिले आहेत. तर त्यांच्या जामीन अर्जावर २१ डिसेंबर रोजी सुनावणी होणार असल्याचेही कोर्टाने नमूद केले आहे. उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मंदाताई खडसे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Protected Content