‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करून डॉ. दाभोलकर यांना आदरांजली ! (व्हिडिओ)

जळगाव प्रतिनिधी | अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या स्थानिक पदाधिकार्‍यांनी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’च्या माध्यमातून विवेकवादी चळवळीचे अध्वर्यू डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यांच्या स्मृती दिनी आदरांजली अर्पण केली.

याबाबत वृत्त असे की, आज पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आठ वर्षे पूर्ण झाली त्यांचे मारेकरी सापडले मात्र सूत्रधार अद्याप मोकाट आहे. त्यामुळे हत्येमागील सूत्रधार पकडावा तसेच तपासातील दिरंगाई थांबवावी या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा जळगावतर्फे महात्मा गांधी उद्यान येथे शुक्रवारी २० ऑगस्ट रोजी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करून डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना आदरांजली वाहण्यात आली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुणे येथे ओंकारेश्वर पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी तपास यंत्रणेने काही मारेकर्‍यांना पकडलं देखील आहे. मात्र या हत्येमागील मुख्य सूत्रधार कोण आहे हे मात्र तपास यंत्रणा अजून पर्यंत शोधू शकली नाही. तसेच हे सूत्रधार अद्यापही मोकाट आहे. या हत्येमागे नेमके कोणाचे डोके आहे हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने लवकरात लवकर या खुनामागील सूत्रधारांना पकडून त्यांना शासन होण्यासाठी प्रयत्न करावे अशी माहिती जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. डी एस कट्यारे यांनी या वेळी दिली.

महात्मा गांधी उद्यान येथे शुक्रवारी सकाळी ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ करून महाराष्ट्र अंनिसच्या कार्यकर्त्यांनी डॉ. नरेंद्र दाभोलकरांना अभिवादन केले. प्रसंगी लढेंगे, जितेंगे, विवेकाचा आवाज,बुलंद करूया, वर्षे झाली आठ, कुठवर पहायची वाट अशा घोषणा देऊन निर्धार व्यक्त करण्यात आला.

याप्रसंगी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डी.एस कट्यारे, कायदा विभागाचे जिल्हा पदाधिकारी अँडव्होकेट भरत गुजर, जिल्हा समन्वयक विश्वजीत चौधरी, शहराध्यक्ष प्रा. दिलीप भारंबे, शहर कार्याध्यक्ष जितेंद्र धनगर, शहर कार्यवाह कल्पना चौधरी, शिरीष चौधरी, आर.एस.चौधरी, मिनाक्षी चौधरी, देविदास सोनवणे आदी उपस्थित होते.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1026067578167751

 

Protected Content