जळगाव प्रतिनिधी । वाढते शहरीकरणं व विकासामुळे बांधकामांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यासोबतच वाळूची मागणीही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र बऱ्याच राज्यांमध्ये त्यामुळे वाळूचा तुटवडा भासत आहे.
याबाबत जिल्हा खनिकर्म अधिकारी दीपक चव्हाण म्हणतात की, अशा परिस्थितीत नैसर्गिक वाळूच्या टंचाईवर एम-सॅण्ड हा उत्तम पर्याय आहे. मात्र या एम-सॅण्डबाबत लोकांना फारशी माहिती नसल्याने त्याचा वापर करावा की नाही ? अशा संभ्रमात लोक आहेत. प्रत्यक्षात एम-सॅण्डच्या वापरामुळे बांधकामाच्या दर्जावर काहीही विपरित परिणाम होत नाही. नैसर्गिक वाळूप्रमाणेच एम-सॅण्डमध्ये केलेले बांधकामही पक्के असते. कारण यात धुलीकण व मातीचे प्रमाण कमी असते. तसेच नैसर्गिक वाळूच्या तुलनेत ही एम-सॅण्ड आर्थिकदृष्ट्याही परवडते. कारण नैसर्गिक वाळूची टंचाई असलेल्या परिसरात वाळूची किंमत अधिक असते. त्यामुळे बांधकामाचा खर्चही वाढतो. या उलट एम-सॅण्डही दगडांचा मशिनमध्ये केलेला चुरा असतो. त्यामुळे ही एम-सॅण्ड कोणत्याही परिसरात सहज उपलब्ध होऊ शकते. आज नैसर्गिक वाळूची टंचाई निर्माण झाल्याने महानगरांमधील बांधकामांसाठी वाळू उपलब्ध करणे अशक्यच आहे. त्यामुळे महानगरामध्ये बांधकामासाठी आता एम-सॅण्डचा वापर सुरू झाला आहे. ही पर्यावरणाच्या बचावाच्या दृष्टीकोनातून एक चांगली सुरूवात असल्याचे मानले जात आहे. आता सर्वत्र बांधकामांसाठी नैसर्गिक वाळूचा वापर बंदच करून एम-सॅण्डचा वापर करण्यावर भर देणे आवश्यक आहे.