निधी फाऊंडेशनचे मासिक पाळी कापडमुक्त अभियान

जळगाव (प्रतिनिधी) मासिक पाळीबात आजही महिलावर्ग बोलतांना संकोच करतो. त्यातच त्यांना मासिक पाळीदरम्यान येत असलेल्या अडचणींची जाण ठेवत जिल्ह्यातील निधी फाऊंडेशनने पुढाकार घेतला. मासिक पाळीत महिलांची मानसिकता बदलावी यासाठी फाऊंडेशनच्या प्रमुख वैशाली विसपुते यांनी मासिक पाळी, कापडमुक्त अभियान हाती घेतले. वर्षभरापूर्वी पाळधीपासून हाकेच्या अंतरावर असलेले पोखरी तांडा गाव त्यांनी दत्तक घेत वर्षभर 200 वर महिला, मुलींना मोफत सॅनटरी नॅपकीन वितरीत केले. शुक्रवारी या अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त पोखरीतांडा गाव कापडमुक्त झाल्याचे सांगत पुन्हा दुसरे गाव दत्तक घेणार असल्याचे वैशाली विसपुते यांनी सांगितले.

 

वर्षभरापूर्वी दत्तक घेतलेल्या पोखरी तांडा येथे शुक्रवार दि.22 रोजी वर्षपूर्तीनिमित्त निधी फाऊंउेशनतर्फे महिलांना मोफत सॅनटरी नॅपकीन वाटप करण्यात आले. यावेळी वैशाली विसपुते यांनी सांगितले की, जन्मानंतर काही दिवसात मुलीचे निधन झाले. तिच्या स्मरणार्थ तसेच तिचे नाव कायम स्मरणात यासाठी 2006 मध्ये निधी फाऊंडेशनची स्थापना केली. यानंतर रिमांड होममधील मुली, महिलांची भेट घेवून, त्यांचे पालकत्व स्विकारले. या महिला, मुलींसाठी विविध उपक्रम राबवून नैराश्य दूूर करुन त्यांच्या चेहर्यावर आनंद पसरविला.

 

अशी सुरू झाली मासिक पाळीविषयी जनजागृती

शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलातील स्वतःच्या दुकानावर एके दिवशी काम करत असताना दुकानासमोर एक मुलगी रडताना दिसली. तिची विचारपूस केल्यावर तिचे शाळेचे कपडे रक्ताने डागाळलेले दिसते व त्यामुळे ती रडत असल्याचे लक्षात आले. एक महिला असल्याने समस्या समजली. आज समाज आणि जग पुढे गेले असले तरी महिलांच्या मासिक पाळी विषयी कुणीही बोलत नाही. त्यांच्या त्या पाच दिवसातील अडचणी आणि त्रास कुणीही लक्षात घेत नाही. जिल्ह्यात अनेक ठिकाणी भेट दिल्यानंतर महिला व मुली मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. तर ग्रामीण आणि काही अशिक्षीत महिला जुन्या विचारसणीमुळे मासिकपाळीत वर्ष न् वर्ष एकच कापड वापरत असल्याचे भयानक वास्तवही समोर आले. त्यामुळे त्या दिवसापासून महिलांसाठी विशेषतः मासिक पाळीविषयी जनजागृती करण्याचे ध्येय मनाशी बाळगल्याची माहिती वैशाली विसपुते यांनी दिली.

 

कुटूंबाचे बळ, कार्याला सुरूवात

निधी फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयात जनजागृती करण्यात येवू लागली. पती सुर्यकांत विसपुते व मुलगा यश यांच्यासह सहकारी हेमंत लोहार यांनी साथ दिली. जिल्ह्यासह इतर काही ठिकाणी शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालयात मोफत सॅनटरी नॅपकीन वेंडिंग मशीन बसविण्यात आले. आज हजारो महिला, मुली त्याचा लाभ घेत आहे. शहरात काम करता करता ग्रामीण भागात जनजागृतीकडे आम्ही वळलो, त्यातूनच कापडमुक्त गाव अभियान ही संकल्पना सुचली आणि पोखरी तांडा हे गाव वर्षभरासाठी दत्तक घेण्यात आले.

 

पोखरी तांडा 100 टक्के कापडमुक्त

मासिकपाळीसह सॅनिटरी नॅपकीनबाबत जनजागृती करण्यासाठी पोखरी तांडा गाव मार्च 2018 मध्ये दत्तक घेतले. अत्यंत दुर्लक्षित असलेल्या गावात येथे 230 (महिला व मुली) महिला मासिकपाळीत कापड वापरत असल्याचे समोर आले. आशा स्वयंसेविका कविता पाटील, सोनाली चव्हाण यांच्या सहकार्याने निधी फाऊंडेशनने कार्यक्रम घेतला व नॅपकिनबाबत तसेच त्याच्या फायद्याबाबत माहिती देण्यात आली. प्रत्येक महिला, मुलीची मासिकपाळीची तारखेची नोंद ठेवण्यासाठी त्यांना एक कार्ड तयार करून देण्यात आले. त्यानुसार पाळी येण्याअगोदरच वर्षभर मोफत नॅपकीनही पुरविले. वर्षभर मोफत सॅनटरी नॅपकीन पुरविल्याने महिलांना त्याचे फायदे कळाले आहेत. व्यसने, घरातील खर्च कमी करु पण यापुढे कापड वापरणार नाही, असा निर्धार महिलांनी केला असल्याचे वैशाली विसपुते यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content