स्व.डॉ.अविनाश आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त भागवत कथा सप्ताहाचे आयोजन

जळगाव, प्रतिनिधी । येथील डॉ.आचार्य कुटुंबीय आणि केशवस्मृती सेवासंस्था समूहाच्या संयुक्त विद्यमाने निष्काम कर्मयोगी, सेवाभावी आणि मातृहृदयी व्यक्तिमत्त्व असलेले स्व.डॉ. अविनाश आचार्य यांच्या स्मृतीनिमित्त येत्या २८ फेब्रुवारी ते ५ मार्च दरम्यान दुपारी २.३० ते ६ यावेळेत छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात प्रख्यात प्रवचनकार आणि कथाकार श्री.दादा महाराज जोशी यांच्या मुखातून भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

आज जगात ज्ञान आणि तंत्रज्ञानाची गती वाढल्याने मानवी जीवनही अत्यंत गतीमान झाले आहे. स्पर्धेमुळे ताण- तणावही प्रचंड वाढले आहे. अशावेळी गरज असते ती मनःशांती टिकविण्याची. हे काम ऋषी-मुनींनी आणि संतांनी वर्षानुवर्षे केले आहे. विविध ग्रंथांच्या माध्यमातून आपले जगणे अधिक सोपे आणि सुलभ करण्याचे अनेक मार्ग त्यांनी दाखविले आहेत. त्यातीलच एक मार्ग म्हणजे भागवत कथा, यातून मानवी जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे जशी मिळतात, तसेच जीवन सुकरपणे जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रेरणा आणि दिशाही मिळतात. म्हणूनच सर्वत्र अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या आयोजनामागेही हाच उद्देश आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण सुखाचे मिळावे आणि आपल्या हातून सत्कार्य घडावे, असे सर्वांनाच वाटत असते. कारण समाजाची सेवा हीच ईश्वराची सेवा आहे, असे डॉ.अविनाश आचार्य म्हणत असत. आयुष्यभर त्यांनी हेच व्रत सांभाळले. ऋषिमुनींनी सांगितलेल्या मार्गावर स्वतःला कार्यरत ठेवणे म्हणजे आपल्याला स्वतःला आत्मोन्नतीकडे नेणे, असे दादा सदैव म्हणत. त्यांच्या या आदर्शाच्या प्रकाशातच समाजासाठी एक अल्पसा आध्यात्मिक प्रयत्न म्हणून या भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जळगावातील चिमुकले राम मंदिरातील कथाकार श्री.दादा महाराज जोशी सुश्राव्य निरुपण करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेला केशवस्मृती सेवासंस्था समूहाचे सदस्य संजय बिर्ला, रत्नाकर पाटील, सुनिल याज्ञीक, अनिता वाणी, डॉ.आरती हुजूरबाजार, केशवस्मृती प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी सागर येवले उपस्थित होते. या श्रवणभक्तीचा सर्व जळगावकरांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक डॉ.आचार्य कुटुंबीय आणि केशवस्मृती सेवासंस्था समूहाने केले आहे.

Protected Content