जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या आदेशानुसार देशभरात ‘वक्फ बोर्ड बचाव’ अभियान राबविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव शहरातील मुस्लिम समुदायाच्या विविध संघटनांनी आज सायंकाळच्या सुमारास एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
वक्फ बोर्ड कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी मुस्लिम समाजाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. एकता संघाचे जिल्हाध्यक्ष फारूख शेख यांनी माहिती दिली की, या मागणीसाठी ७ जुलैपर्यंत दर शुक्रवारी मुस्लिम बांधव वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणार आहेत. यात लोकशाही पद्धतीने काळ्या फिती लावणे, मोर्चे काढणे, विविध ठिकाणी आंदोलन करणे, साखळी उपोषण करणे आणि धरणे आंदोलन यांचा समावेश असेल.
आजच्या मोर्चात शहरातील अनेक मुस्लिम संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हा कायदा मुस्लिम समुदायाच्या धार्मिक आणि सामाजिक अधिकारांवर गदा आणणारा असल्याचा आरोप केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केले.