विद्यापीठात आंबेडकर जयंती महोत्सवाचा शानदार प्रारंभ; शाहीर शिवाजी पाटील यांच्या पोवड्याने रंगत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात क्रांतिसूर्य महात्मा फुले ते प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव २०२५ चा आज विद्यापीठाच्या प्रांगणात उत्साहात प्रारंभ झाला. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी सुप्रसिद्ध शाहीर शिवाजी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या शाहिरी जलसा व पोवाड्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे विद्यापीठातील वातावरण भारून गेले होते. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत …

शाहीर शिवाजी पाटील यांनी आपल्या प्रभावी वाणी आणि वीररसात्मक पोवाड्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, तसेच त्यांच्या विचारांना उजाळा दिला. याप्रसंगी शाहीर भूषण पवार आणि भालचंद्र सामुद्रे या अन्य कलाकारांनीही विविध प्रेरणादायी गीते सादर केली, ज्यामुळे कार्यक्रमात अधिक रंगत आली. विद्यापीठातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शहरातील आंबेडकरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते. शाहीर शिवाजी पाटील यांच्या पोवाड्यांनी उपस्थितांमध्ये एक चैतन्य निर्माण झाले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची महती सर्वांपर्यंत पोहोचली.

या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने विद्यापीठात विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून तरुण पिढीला महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. शाहीर शिवाजी पाटील यांच्या पोवाड्यानं या महोत्सवाची शानदार सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस विद्यापीठात उत्साहाचे वातावरण असणार आहे.

Protected Content