Home क्राईम अवघ्या आठशे रुपयांच्या वादातून मामेभावाचा खून; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ !

अवघ्या आठशे रुपयांच्या वादातून मामेभावाचा खून; धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ !

0
3


भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अवघ्या ८०० रुपयांच्या व्यवहारातून झालेल्या वादाचे पर्यवसान खुनात झाल्याची धक्कादायक घटना भडगाव परिसरात घडली आहे. नात्याने आत्तेभाऊ असलेल्या तरुणाने मामेभावावर दगडाने हल्ला करून त्याचा खून केल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. या घटनेतील काही बाबी अत्यंत धक्कादायक असून पोलीस त्यांचा सखोल तपास करत आहेत.

या घटनेत धर्मा जुगा पवार (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे, तर जुगा कांतिलाल पवार (वय ३०) याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. दोघेही नात्याने मामे-आत्तेभाऊ असून गावोगावी फिरून रुद्राक्ष विक्री करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, कालच्या दिवशी धर्मा पवार यांनी सुमारे ८०० रुपयांचे रुद्राक्ष विकले होते. याच रकमेतून वाटा मिळण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. सायंकाळी साधारण साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास दोघे भडगाव रेल्वे स्टेशन परिसरात मद्यपान करत असल्याची माहिती आहे. याच ठिकाणी पैशांवरून त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला.

हा वाद काही वेळातच विकोपाला गेला. संशयित आरोपी जुगा पवार याने धर्मा पवार यांच्यावर दगडाने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ला गंभीर स्वरूपाचा असल्याने धर्मा यांचा मृत्यू झाला. मात्र, यानंतर घडल्याचे सांगितले जाणारे प्रकार अधिकच हादरवून टाकणारे आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, धर्मा पवार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या तोंडातील दात दगडाच्या सहाय्याने तोडण्यात आल्याचा संशय आहे. यातील काही दात संशयित आरोपीने आपल्याजवळील बॅगेत ठेवल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकारामागील नेमके कारण काय होते, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलीस तपासातून त्याचा उलगडा होणे अपेक्षित आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी सुरू असताना जवळच्या शेताच्या दिशेने कुत्र्यांच्या सतत भुंकण्याचा आवाज पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांनी त्या दिशेने जाऊन शेत परिसरात शोध घेतला.

यावेळी शेतात संशयित आरोपी बसलेला आढळून आल्याची माहिती आहे. तो मद्याच्या नशेत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील सामानाची तपासणी केली असता बॅगेत मृत व्यक्तीचे असल्याचा संशय असलेले काही दात आढळल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याच बॅगेत दोन जिवंत कबुतरेही आढळून आल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. अवघ्या ८०० रुपयांच्या व्यवहारातून सुरू झालेल्या वादात एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. मृतदेहाची वैद्यकीय तपासणी तसेच घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे पोलीस पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, खुनामागील नेमका घटनाक्रम, दात तोडण्यामागील कारण, दोघांमध्ये यापूर्वी काही वाद होता का, तसेच घटनेच्या वेळी नेमके काय घडले होते यासह विविध बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. संशयित आरोपीविरुद्ध लागू कलमांनुसार कारवाई करण्यात येत असून पुढील तपासातून या धक्कादायक घटनेचे आणखी तपशील समोर येण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound