
भडगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पूर्ववैमनस्यातून २३ वर्षीय तरुणावर गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर प्रकरणात भडगाव पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. जयेश ज्ञानेश्वर पवार यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत एका आरोपीला आधी ताब्यात घेतले, तर मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याला २८ नोव्हेंबर रोजी धुळे येथून ताब्यात घेतले. या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

२४ नोव्हेंबर २०२६ रोजी फिर्यादी यांनी भडगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे पती जयेश ज्ञानेश्वर पवार (वय २३, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव) यांचा मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याच्यासोबत दोन ते तीन दिवसांपूर्वी किरकोळ वाद झाला होता. या वादाच्या पार्श्वभूमीवर मुन्ना उर्फ गिरीश राजपूत याने जयेश पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
त्यानंतर २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजेच्या सुमारास गोंडगाव-कजगाव रोडवरील सोलर प्लांटजवळ जयेश पवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला व छातीला दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी त्यांना धुळे येथील मी सेवा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी भडगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक महेश टाक यांना गुन्ह्याचा तपास करून प्रकरण उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक महेश टाक यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार करून तपासासाठी आवश्यक सूचना दिल्या. विशेष पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक भौतिक पुरावे संकलित केले. तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे २५ नोव्हेंबर रोजी पियुष उर्फ विरु दिलीप पाटील (वय २२, रा. कजगाव, ता. भडगाव, जि. जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता, त्याने गुन्ह्यात सहभाग असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे. तसेच, जयेश पवार यांच्यावर गोळीबार करणारा मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत असल्याची माहिती त्याच्याकडून मिळाल्याचे पोलिसांनी सांगितले.
त्यानंतर तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे मुख्य आरोपी मुन्ना उर्फ गिरीश मुक्तारसिंग राजपूत याचा शोध घेण्यात आला. अखेर २८ नोव्हेंबर २०२६ रोजी त्याला धुळे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यानेही गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. या प्रकरणात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव विभाग विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनवणे, पोहेकॉ नरेंद्र विसपुते, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.



