
पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील शिवसेनेचे सक्रिय कार्यकर्ते, समर्थ सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा आर. के. जिमचे संचालक राजेश प्रल्हाद काळे (वय ५८) यांचे २८ नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी निधन झाले. जळगावहून पाचोऱ्याकडे येत असताना बिल्दी धरणाजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर आदळली. या घटनेने पाचोरा शहरासह परिसरात शोककळा पसरली आहे.

राजेश काळे हे स्वामी विंग, रिंग रोड, पाचोरा येथील रहिवासी होते. २८ नोव्हेंबर रोजी ते आपल्या एमएच १९ ईजी २२११ क्रमांकाच्या कारने जळगावहून पाचोऱ्याकडे येत होते. दरम्यान, सायंकाळी सुमारे ४.१५ वाजेच्या सुमारास बिल्दी धरणाजवळ त्यांच्या कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात राजेश काळे यांच्या डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने पाचोरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाल्याचे पाचोरा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राजेश काळे हे समर्थ सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय होते. तसेच आर. के. जिमचे संचालक म्हणूनही त्यांची ओळख होती. शिवसेनेचे धडाडीचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी पक्षाच्या कामात सहभाग घेतला होता. सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच हिरिरीने सहभागी होणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून आणि दोन भाऊ असा परिवार आहे. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या राजेश काळे यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार, शिवसैनिक आणि सामाजिक क्षेत्रातील सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या अपघाती निधनाने पाचोरा शहरासह संपूर्ण परिसरात शोक व्यक्त होत आहे.



