
जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी जळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक हालचालींना वेग आला आहे. याच अनुषंगाने मनसेतर्फे पद्मालय विश्रामगृह येथे शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन, पूर्वतयारी आणि कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, बैठकीचे औचित्य साधून कुसुंबा, रायपूर आणि कंडारी परिसरातील सुमारे १०० युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर प्रवेश केला.

पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करणे आणि आगामी दौऱ्याच्या तयारीला दिशा देणे, हा या बैठकीमागील प्रमुख उद्देश होता. बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना विविध जबाबदाऱ्यांचे वाटप केले. तसेच दौऱ्याच्या नियोजनासाठी आवश्यक सूचना देत संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी कुसुंबा, रायपूर आणि कंडारी परिसरातील सुमारे १०० युवकांनी मनसेच्या ध्येयधोरणांवर विश्वास व्यक्त करत पक्षात प्रवेश केला. नव्याने पक्षात दाखल झालेल्या युवकांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. या प्रवेशामुळे संबंधित परिसरात पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला चालना मिळणार असल्याचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या बैठकीला मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, राजेंद्र निकम, ललित शर्मा, संजय मोती यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



