Home Cities जळगाव जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान २५ वा रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव

जळगावात ७ ते १० जानेवारीदरम्यान २५ वा रौप्यमहोत्सवी बालगंधर्व संगीत महोत्सव

0
2


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय अभिजात संगीताच्या क्षेत्रात खानदेशचा सांस्कृतिक मानदंड म्हणून ओळख निर्माण केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचा यंदा रौप्यमहोत्सवी टप्पा साजरा होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या सहकार्याने आणि स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने ७ ते १० जानेवारी २०२७ या कालावधीत २५ वा बालगंधर्व संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीराजे नाट्य मंदिरात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ११ या वेळेत हा स्वरसोहळा रंगणार असून, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती मिळवलेल्या कलाकारांच्या गायन, वादन आणि नृत्याविष्कारांचा आनंद जळगावकर रसिकांना घेता येणार आहे.

या रौप्यमहोत्सवी महोत्सवाच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सहकार्य लाभले आहे. जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड हे मुख्य प्रायोजक असून, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि भारत सरकारचे संस्कृती मंत्रालय यांचेही सहकार्य मिळणार आहे. सुहान्स केमिकल्स प्रा. लि. तसेच होस्टिंग ड्युटीच्या माध्यमातून चांदोरकर टेक्नॉलॉजीज प्रा. लि. यांचेही योगदान असणार आहे. गेल्या २५ वर्षांपासून प्रतिष्ठानने भारतीय अभिजात संगीताची परंपरा जपण्यासोबतच नव्या पिढीपर्यंत ती पोहोचविण्याचे काम सातत्याने केले आहे.

महोत्सवाची सुरुवात ७ जानेवारी रोजी उद्घाटन समारंभाने होणार आहे. पहिल्या सत्रात पुण्यात वास्तव्यास असलेल्या प्रतिभावान गायिका पंडिता मंजुषा पाटील-कुलकर्णी यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होईल. त्यांना संवादिनीवर लीलाधर चक्रदेव, तर तबल्यावर आशय कुलकर्णी साथसंगत करतील. दुसऱ्या सत्रात जागतिक कीर्तीच्या कथक गुरू पंडिता शमाताई भाटे यांच्या शिष्यांचा ‘त्रिमिती’ हा कथक नृत्यावर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. प्रमोद वाघ, श्रेया कुलकर्णी आणि नयन कोहले हे तिघे कलाकार आपल्या नृत्याविष्कारातून रसिकांसमोर कथक कलेचे विविध पैलू उलगडतील.

८ जानेवारी रोजी दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी असलेले सहेजदीप सिंग यांचे गझल आणि ठुमरी गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर अमनदीप सिंग, तर दिलरुब्यावर अंशदीप सिंग साथ करतील. दुसऱ्या सत्रात बनारस येथील प्रख्यात कथक नर्तक पं. रुद्रशंकर मिश्रा यांचा कथक नृत्याविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यांना पखावजाची साथ त्यांचे गुरू आणि पिताश्री पं. माताप्रसाद मिश्रा करतील. तबला व पढंतची साथ उदयशंकर मिश्रा, तर सारंगीची साथ ओम सहाई मिश्रा करणार आहेत.

९ जानेवारी रोजी तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पंडिता भारती राजपूत यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायन होणार आहे. त्या मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयात उपसंचालक पदावर कार्यरत असून, पं. कुमार गंधर्व यांच्या संगीत परंपरेतील गायिका आहेत. या सत्रात त्या कुमारजींच्या अनवट बंदिशी आणि निर्गुणी भजने सादर करणार आहेत. त्यांना तबल्यावर निशांत शर्मा, तर संवादिनीवर सुप्रिया मोडक-जोशी साथ करतील. तिसऱ्या दिवसाच्या पुढील सत्रात पं. रामदास पळसुले आणि पं. कृष्णा साळुंखे यांची तबला-पखावज जुगलबंदी रंगणार आहे. या जुगलबंदीला संवादिनीवर पं. अजय जोगळेकर साथ देतील. तालवाद्यांच्या या अनोख्या संगमाची रसिकांना विशेष पर्वणी मिळणार आहे.

१० जानेवारी रोजी महोत्सवाच्या चौथ्या आणि अंतिम दिवशी पहिल्या सत्रात नाट्यसंगीत आणि अभंगवाणीचा स्वरानुभव मिळणार आहे. स्वराधीश डॉ. पं. भरत बलवल्ली हे नाट्यसंगीत आणि अभंग सादर करतील. त्यांना ऑर्गनवर मकरंद कुंडले, तबल्यावर रामकृष्ण करंबेळकर आणि बासरीवर वरद कवठापूरकर साथ देतील. या सत्राचे निरूपण प्रख्यात सुसंवादिनी मंगला खाडिलकर करणार आहेत.

नव्या पिढीला अभिजात संगीताची गोडी लागावी आणि आधुनिक संगीताच्या माध्यमातूनही भारतीय संगीतपरंपरेची ओळख व्हावी, यासाठी प्रतिष्ठान गेल्या २५ वर्षांपासून विविध प्रयोग करीत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून यंदाच्या रौप्यमहोत्सवी महोत्सवात विशेषतः जेन-झी अर्थात नव्या पिढीसाठी अभिजीत पोहनकर आणि त्यांचे सहकारी ‘बॉलीवुड घराना’ हा विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत. भारतीय अभिजात संगीत आणि लोकप्रिय संगीताचा संगम असलेला हा कार्यक्रम महोत्सवाची सांगता करणार आहे. या चारही दिवसांच्या कार्यक्रमांचे सूत्रसंचालन मुंबईच्या सुसंवादिनी सौ. मंगला खाडिलकर करणार आहेत. तरुण पिढीने आवर्जून ऐकावा आणि ज्येष्ठ रसिकांनीही तितक्याच उत्साहाने अनुभवावा, असा हा चार दिवसीय स्वरसोहळा असणार आहे. गायन, वादन, कथक नृत्य, गझल, ठुमरी, नाट्यसंगीत, अभंगवाणी आणि आधुनिक संगीताचा संगम या महोत्सवात अनुभवायला मिळणार आहे.

कार्यक्रम वेळेवर सुरू होण्यासाठी रसिकांनी वेळेपूर्वी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रवेशिकांसाठी सौ. दीपिका चांदोरकर यांच्याशी ९८२३०७७२७७ किंवा २२२७७२२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानचे कार्यालय १०१, पार्क रॉयल, १३, वल्लभ नगर, रामानंद चर्चजवळ, जळगाव येथे आहे. पत्रकार परिषदेत शरदचंद्र छापेकर, डॉ. विवेकानंद कुलकर्णी आणि दीपक चांदोरकर यांनी महोत्सवाची माहिती दिली. जळगावच्या सांस्कृतिक विश्वात महत्त्वाचे स्थान निर्माण केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाच्या रौप्यमहोत्सवी पर्वात चार दिवस अभिजात संगीताची मेजवानी मिळणार असून, जळगावकर रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक आणि प्रायोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound