Home आरोग्य नशिराबादमधील औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर ; दुर्गंधी रोखण्यासाठी नगराध्यक्ष योगेश पाटील यांची...

नशिराबादमधील औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर ; दुर्गंधी रोखण्यासाठी नगराध्यक्ष योगेश पाटील यांची कंपन्यांना सूचना

0
1


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद परिसरात गेल्या काही दिवसांपासून पसरत असलेल्या तीव्र दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, औद्योगिक कंपन्यांमधून होणाऱ्या संभाव्य प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नशिराबाद नगरपरिषदेत लोकनियुक्त नगराध्यक्ष योगेश नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरातील दुर्गंधी, हवा आणि पाण्याचे प्रदूषण, पर्यावरण संवर्धन तसेच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (CSR) विकासकामे करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित कंपन्यांनी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना नगराध्यक्षांनी दिल्या.

बैठकीत भाग्यवर्धन पॉलीफ्लेक्स कंपनीतून बाहेर पडणाऱ्या अशुद्ध पाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पाण्यावर योग्य प्रक्रिया करून त्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना कंपनी प्रतिनिधींना देण्यात आल्या. प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे पर्यावरणाला आणि परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

अदाणी सिमेंटमधून हवेत पसरणाऱ्या धूलिकणांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना त्रास होत असल्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. धुळीचा प्रसार कमी करण्यासाठी सक्शन मशीन बसविण्याची मागणी करण्यात आली. औद्योगिक प्रक्रियेदरम्यान निर्माण होणाऱ्या धूलिकणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना कराव्यात, जेणेकरून शेतकरी आणि नागरिकांना होणारा त्रास कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. समृद्धी केमिकलमधून येणाऱ्या दुर्गंधीबाबतही बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून परिसरात जाणवणाऱ्या तीव्र वासामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर कंपनी व्यवस्थापनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. भविष्यात अशा प्रकारे नागरिकांना त्रास होणार नाही, यासाठी दुर्गंधी निर्माण होण्याची कारणे तपासून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

औद्योगिक प्रदूषणाच्या प्रश्नासोबतच कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीचा (CSR) वापर स्थानिक विकासासाठी करण्याबाबतही चर्चा झाली. नशिराबाद परिसरात दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्यासाठी CSR निधीतून विशेष तरतूद करावी, अशी मागणी नगराध्यक्ष योगेश पाटील यांनी केली. ग्रामीण आणि शहरी भागातील पशुधनाला चारा उपलब्ध होण्यासाठी कंपन्यांनी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून सहकार्य करावे, असे त्यांनी सुचविले. याशिवाय शहरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन या मूलभूत विषयांवरही कंपन्यांनी CSR निधीतून सहकार्य करावे, अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आली. औद्योगिक क्षेत्राचा विकास होत असताना स्थानिक नागरिकांच्या जीवनमानातही सुधारणा झाली पाहिजे. कंपन्यांनी आपल्या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून परिसराच्या सर्वांगीण विकासात योगदान देणे आवश्यक असल्याचे चर्चेत अधोरेखित करण्यात आले.

या बैठकीला उपनगराध्यक्ष पंकज महाजन, मुख्याधिकारी सोनवणे, नगरसेवक लालचंद पाटील, सभापती चेतन बऱ्हाटे यांच्यासह नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी आणि विविध औद्योगिक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. संबंधित कंपन्यांच्या प्रतिनिधींसमोर प्रदूषणाच्या तक्रारी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांचा मुद्दा मांडण्यात आला. दरम्यान, बैठक आणि त्यातील सूचनांनंतरही नशिराबादकरांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. शहरात पसरलेली दुर्गंधी केवळ बैठका घेऊन आणि सूचना देऊन थांबणार का? नागरिकांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष उपाययोजनांची अपेक्षा आहे. प्रदूषणाची कारणे शोधणे, त्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे आणि उपाययोजनांची अंमलबजावणी झाली आहे की नाही, याची नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. शहरातील हवा, माती आणि पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित यंत्रणांनी नियमित निरीक्षण करावे, औद्योगिक कंपन्यांच्या कामकाजाची तपासणी करावी आणि पर्यावरणविषयक नियमांचे उल्लंघन आढळल्यास नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. औद्योगिक विकासासोबत नागरिकांचे आरोग्य आणि पर्यावरणाचे संरक्षणही तितकेच महत्त्वाचे आहे.


Protected Content

Play sound