Home प्रशासन सातपुड्यात सागवान वृक्षांची बेकायदा कत्तल सुरू असल्याचा आरोप ; यावल पश्चिम वनविभागाच्या...

सातपुड्यात सागवान वृक्षांची बेकायदा कत्तल सुरू असल्याचा आरोप ; यावल पश्चिम वनविभागाच्या कार्यपद्धतीवर मनविसेचे प्रश्नचिन्ह

0
3


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम जंगल परिसरात मौल्यवान सागवान वृक्षांची मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तल होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. सर्वसामान्य नागरिकांना सहज पोहोचणेही कठीण असलेल्या जंगल भागात हिरवीगार आणि डेरेदार सागवानाची झाडे तोडली जात असून, तोडलेल्या लाकडापासून घटनास्थळीच विविध वस्तू तयार केल्या जात असल्याचे छायाचित्रांमधून समोर आल्याचा दावा संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे सातपुड्यातील मौल्यवान वनसंपत्तीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, यावल पश्चिम वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

एकीकडे वनविभागाकडून जंगलाच्या संरक्षणासाठी नियमित गस्त घातली जात असल्याचे आणि विविध ठिकाणी तपासणी नाके असल्याचे सांगितले जाते. मात्र, दुसरीकडे दुर्गम जंगल परिसरात सागवानासारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल होत असल्याचा आरोप समोर येत असेल, तर वनविभागाची यंत्रणा नेमकी काय काम करत आहे, असा सवाल मनविसेने उपस्थित केला आहे. जंगलातील वृक्षतोड वनविभागाच्या नजरेस कशी पडली नाही? संबंधित तस्करांना कोणाचे अभय आहे? अधिकाऱ्यांचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत आहे की जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे? असे अनेक प्रश्न संघटनेने उपस्थित केले आहेत. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने यावल पश्चिम वनक्षेत्र अधिकारी प्रशांत जोशी यांच्याकडे निवेदन सादर करून तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, या गंभीर प्रकरणाची स्थानिक पातळीवर तातडीने दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्याऐवजी उपवनसंरक्षक, यावल वनविभाग जळगाव, वनसंरक्षक प्रादेशिक धुळे, मुख्य वनसंरक्षक प्रादेशिक नाशिक, नागपूर विभाग तसेच मंत्रालयापर्यंत निवेदन पाठविण्याचा सल्ला दिला जात असल्याचे मनविसेने म्हटले आहे. या प्रतिसादाबद्दल संघटनेने नाराजी व्यक्त केली असून, स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी नेमकी काय, असा सवाल केला आहे.

सातपुड्यातील जंगलाचे संरक्षण करणे आणि अवैध वृक्षतोड रोखणे ही स्थानिक वनविभागाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे या प्रकरणात संबंधित वरिष्ठ अधिकारी, वनपाल, तीन वनरक्षक तसेच खालच्या स्तरावरील कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीची आणि कर्तव्यपालनाची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात आली आहे. जंगलात एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याचा आरोप असताना संबंधित यंत्रणेला त्याची माहिती कशी मिळाली नाही, नियमित गस्त घातली जात होती का, तसेच अवैध वृक्षतोड आणि लाकूड तस्करी रोखण्यासाठी कोणती कारवाई करण्यात आली, याची तपासणी वरिष्ठ स्तरावर व्हावी, असे संघटनेने निवेदनात नमूद केले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष कल्पेश राजेंद्र पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. सातपुड्यातील संबंधित जंगल परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून वृक्षतोड झालेल्या ठिकाणांचा पंचनामा करण्यात यावा, तसेच अवैध वृक्षतोडीत सहभागी असल्याचे निष्पन्न होणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासोबतच वनविभागातील संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

या प्रकरणात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याचे अवैध वृक्षतोड करणाऱ्या तस्करांशी आर्थिक अथवा अन्य स्वरूपाचे संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यास संबंधितांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका मनविसेने मांडली आहे. चौकशी केवळ स्थानिक पातळीपुरती मर्यादित न ठेवता वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र पथकामार्फत करण्यात यावी, जेणेकरून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष तपासणी होऊन दोषींवर योग्य ती कारवाई करता येईल, अशी मागणीही करण्यात आली आहे. सातपुड्यातील वनसंपत्ती ही पर्यावरणीय समतोल आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सागवान वृक्षांची कथित अवैध कत्तल रोखण्यासाठी केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता प्रत्यक्ष जंगलात पाहणी, प्रभावी गस्त आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होणे गरजेचे आहे. जंगलातील मौल्यवान वृक्षांची लूट कोणाच्याही वैयक्तिक फायद्यासाठी होऊ दिली जाणार नाही, असा इशारा कल्पेश पवार यांनी दिला आहे. या प्रकरणात ठोस कारवाई होईपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


Protected Content

Play sound