Home क्राईम नशिराबादमध्ये गोडाऊन चोरीचा अवघ्या पाच तासांत छडा ; पिता-पुत्रासह दोघांना अटक

नशिराबादमध्ये गोडाऊन चोरीचा अवघ्या पाच तासांत छडा ; पिता-पुत्रासह दोघांना अटक

0
2


नशिराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद शहरातील मुक्तेश्वर नगर परिसरात किराणा दुकानाच्या गोडाऊनमधून ५३ हजार ८०० रुपये किमतीचा किराणा माल चोरी झाल्याच्या प्रकरणाचा नशिराबाद पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी पिता-पुत्रासह दोन संशयित आरोपींना अटक केली असून, या तत्पर कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीची चर्चा होत आहे.

नशिराबाद येथील पेठभागात राहणारे शांताराम प्रल्हाद सोनवणे (वय ४९) यांचे मुक्तेश्वर नगर परिसरात किराणा दुकान व गोडाऊन आहे. त्यांनी २८ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास गोडाऊनला कुलूप लावले होते. मात्र, २९ नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास गोडाऊन उघडण्यासाठी गेले असता, कुलूप व कोंडा तुटलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यामुळे गोडाऊनमध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

गोडाऊनमध्ये पाहणी केली असता शेंगदाण्याचा कट्टा, सोयाबीन तेलाचे डबे, काजू, बदाम, चहा पावडर, मिरची पावडर, मखाना, शोफ, मोहरी यासह विविध किराणा साहित्य चोरीला गेल्याचे दिसून आले. चोरी झालेल्या मालाची एकूण किंमत ५३ हजार ८०० रुपये असल्याचे समोर आले. या घटनेनंतर नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

.गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलिसांनी तपासाला गती दिली. गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत वीरेंद्र वामन पाटील (वय ५१, रा. पेट्रोल पंपासमोर, मुक्तेश्वर नगर, नशिराबाद) आणि दिगंबर वीरेंद्र पाटील (वय २३, रा. मुक्तेश्वर नगर, नशिराबाद) या दोघांना ताब्यात घेत अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पिता-पुत्राचा समावेश आहे

गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या पाच तासांच्या आत आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. चोरीस गेलेला किराणा माल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार गुणवंत देशमुख करीत आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार रितेश चौधरी, गुणवंत देशमुख, चंद्रकांत पाटील, पोलीस कॉन्स्टेबल आरिफ तडवी, भरत बाविस्कर आणि पंकज सोनवणे यांच्या पथकाने केली.


Protected Content

Play sound