‘ते’ पत्र चोरतांना अजितादांसोबत भाजपची कोण लोकं होती ? : शिवसेनेचा सवाल

मुंबई प्रतिनिधी । चंद्रकांत पाटील यांनी अजितदादांनी आमदारांच्या पाठींब्याचे पत्र चोरले असल्याचा गंभीर आरोप केल्यावर शिवसेनेने यावरून पलटवार करत ते पत्र चोरतांना भाजपची कोण लोकं सोबत होती असा खोचक प्रश्‍न आज विचारला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनातील अग्रलेखात आज चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यात पुढे म्हटले आहे की, भाजपचे नेते आजही दीड-दोन वर्षांपूर्वीच्या ‘अजित-देवेंद्र’ यांच्या शपथविधीच्या पहाट सोहोळय़ातच गुंतून पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी एक चांगले केले. त्यांनी आता सांगून टाकले, अजित पवारांबरोबर घाईघाईत सरकार बनवले ही आपली चूकच झाली. असे केल्याने आपल्या प्रतिमेस तडा गेल्याचेही त्यांनी मान्य केल्याने त्यांच्यापुरता या प्रकरणावर पडदा पडला.

पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मात्र त्यांचे मन त्या पहाटेच्या गुंत्यातून बाहेर पडू देत नाही. राजकारणातील गुंत्यात इतके अडकून पडणे बरे नसते, पण पाटलांना हे सांगायचे कोणी! पाटील यांनी आता असा स्फोट केला आहे की, पहाटेच्या शपथविधीसाठी अजित पवार यांनी जे ५४ आमदारांच्या सहीचे पत्र भाजप नेत्यांच्या माध्यमातून राज्यपालांना सादर केले तो एक मोठा घोटाळा आहे.

किरकोळ चोऱयामाऱया करून राजकीय गुजराण करणाऱ्यातले अजित पवार नाहीत. पहाटे त्यांनी एक प्रयोग केला तो फसला. असे प्रयोग देशाच्या राजकारणात अधूनमधून होतच असतात. दुसरे असे की,अजित पवारांनी ५४ आमदारांच्या सहीचे पत्र चोरणे हे नैतिक की अनैतिक असा सवाल चंद्रकांत पाटलांनी करणे हे त्यांच्या मनातील अस्वस्थतेचे लक्षण आहे.

अजित पवारांनी पत्र चोरले हे अनैतिक असल्याचा पाटलांचा दावा मान्य केला तरी ते चोरलेले पत्र भाजप नेत्यांनी स्वीकारणे, त्यावर विश्वास ठेवून ते राज्यपालांकडे सुपूर्द करणे, त्या चोरलेल्या पत्राच्या आधारे राजभवनात सरकार स्थापन करून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणे हे फक्त अनैतिकच नाही, तर बेकायदेशीरदेखील ठरते. शिवाय हा मोठा अपराधदेखील आहे!

चोरी हा गुन्हा आहेच, पण चोरीचा माल विकत घेणे हा त्यापेक्षा मोठा गुन्हा आहे. त्यामुळे चोरलेल्या पत्राचा राजकीय व्यापार करणाऱ्या भाजप व त्यांच्या पुढाऱ्यांवर निवडणूक आयोगाने व पोलिसांनी फौजदारी गुन्हेच दाखल केले पाहिजेत. चंद्रकांत पाटलांनी याप्रकरणी ‘आ बैल मुझे मार’ असेच केले आहे. अजित दादा मोठ्या पवारांच्या ड्रॉवरमधून पत्र चोरीत असताना त्या काळोख्या खोलीत ‘टॉर्च’चा प्रकाश मारण्यासाठी व पत्र हाती येताच खिडकीतून पोबारा करण्यासाठी अजित पवारांबरोबर भाजपचे कोण कोण लोक होते? याचाही खुलासा आता व्हायला हवा.

Protected Content