मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक प्रा.जोशी यांचा आदिवासी भागात दौरा

nmu new

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या सिलेज एरिया डेव्हल्पमेंट उपक्रमांतर्गत ६ ते ८ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक प्रा.जे.बी.जोशी व त्यांचे सहकारी प्राध्यापक हे नंदुरबार जिल्ह्यातील काही गावांना भेटी देऊन आदिवासी भागातील समस्या जाणून घेणार आहेत.

राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या सहकार्याने विद्यापीठाला सिलेज प्रकल्प मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत विज्ञान व तंत्रज्ञानातून समृध्दी हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेचे माजी संचालक, प्रा.जे.बी.जोशी हे शुक्रवारी विद्यापीठात येणार आहेत. त्यांच्या सोबत या रासायनिक तंत्रज्ञान संस्थेतील बारा प्राध्यापक, चोवीस संशोधक विद्यार्थी असणार आहेत. हा सर्व चमू नंदुरबार जिल्ह्यातील बारीपाडा, खांडबारा, शितलपाडा, नगाव, बालअमराई या गावांना भेटी देऊन विविध घटकांशी संवाद साधारण आहेत. यामध्ये स्वयंनिर्वाही गट, शेतकरी यांचा समावेश असेल. त्या भागातील समस्या जाणून घेऊन त्यावर कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करता येतील हे पाहणार आहेत. विद्यापीठासोबतच बायफ, कृषी विज्ञान केंद्र या संस्थेचे सहकार्य लाभणार आहे.

प्रा.जे.बी.जोशी यांच्या समवेत डॉ.व्ही.व्ही देवधर, डॉ. अजित पाटणकर, डॉ. पानसे हे तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. या भेटीच्या आधी सकाळी विद्यापीठात कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांच्या समवेत या चमूची चर्चा होणार आहे. त्यावेळी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, व्य.प.सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील, प्राचार्य व्ही.आर. पाटील, प्राचार्य पी.आर.चौधरी, डॉ.सतीष चौधरी उपस्थित राहणार असल्याची माहिती सिलेज प्रकल्पाचे समन्वयक प्रा.एस.टी. बेंद्रे यांनी दिली.

Protected Content