बहुआयामी व्यक्तिमत्व : डॉ. उल्हास कडुसकर

 

 

 

 

जळगावात इथिकल मेडिकल प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांमध्ये डॉक्टर उल्हास कडुसकर यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. माझी त्यांची पहिली भेट १९८७ साली शासकीय तंत्रनिकेतनच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप कार्यक्रमात झाली होती. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी ‘फ्रुट सॅलड’चा किस्सा ऐकवून आम्हाला लोटपोट केले होते. त्यानंतर सेकंड इयरला डी.डी. पाटील सर आम्हाला त्यांच्या इंडिया गॅरेज परिसरातील हॉस्पिटलच्या बांधकाम साईटवर घेऊन गेले होते. तेव्हा मला जाणवले की, ते फक्त उपचार करणारे डॉक्टर नसून एक तंत्रज्ञानाची कास धरणारे असामी आहेत. त्यांंच्या बांधकामात आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेल्या ब्लॉक्सचा वापर केला जात होता.

पुढील काळात मी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने जळगावातच स्थायिक झालो. डॉक्टरांशी वेगवेगळ्या निमित्ताने अधून-मधून भेटी होत होत्या. योगायोगाने माझ्या पत्नीच्या पहिल्या गर्भारपणात आम्ही डॉक्टरांचीच ट्रिटमेंट घेतली होती. त्याकाळात माझी पत्नी वंदनाची प्रकृती बघून माझे सगळे नातलग म्हणायचे की, तिचे सिझेरियनच होईल, मनाची तयारी करून ठेव. पण डॉक्टरांनी अत्यंत योग्य ट्रिटमेंट देऊन आणि आपले सगळे कौशल्य वापरून बाळंतपण नैसर्गिकरित्या करून दाखवले. त्यानंतरच्या काळात त्यांच्याकडे ज्या ही परिचितांना पाठवले त्यांनाही डॉक्टरांनी अशीच वागणूक दिल्याचा सुखद अनुभव आला.

डॉक्टरीचा रुक्ष पेशा करतानाही ते कथा, कविता आणि नाट्य अशा प्रांतात  रमायचे. वाचन कट्ट्यावर ते सक्रीय असायचे. प्रत्येक भेटीत त्यांचा एक प्रश्न ठरलेला असायचा ” सध्या काय वाचताय ?” एकदा त्यांच्याकडे गप्पा मारताना त्यांनी ‘साधना’ मासिकातील काही कविता वाचून आणि  समजावून सांगितल्या होत्या, तो एक विलक्षण अनुभव होता. त्यांच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

गेल्या वर्षी त्यांच्यावर नागपुरात मोठी शस्त्रक्रिया करण्यात आली होती, ती यशस्वी ठरली होती. जळगावात परतल्यानंतर त्यांनी फोन करून मला भेटायला बोलावले, तेव्हाच त्यांची खंगलेली प्रकृती बघून मनात चर्रर्र झाले होते. पण त्यांचा बोलण्यातला उत्साह तोच होता. अखेर लिव्हर कॅन्सरच्या आजाराने डॉक्टरांना हरवले. काळाने आपल्यातून त्यांना खूप लवकर ओढून नेले आहे. त्यांच्यासारखा बहुगुणी व्यक्तीचा सहवास आपण जळगावकरांना मार्गदर्शन करण्यासाठी आणखी दीर्घ काळ लाभायला हवा होता, एवढीच इच्छा होती, ती आता पूर्ण होऊ शकत नाही.

लेखक – प्रमोद माळी, जळगाव.

Add Comment

Protected Content