मुक्ताईनगर तालुक्याला वादळी पावसाचा फटका; नुकसानीचे सरसकट पंचनामे

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील उचंदा तसेच परिसरातील गावांना आज वादळी पावसाने झोडपल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात आ. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी तातडीने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिलेत.

परंतु ते मुंबई असल्याने त्यांनी रावेर ,मुक्ताईनगर तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सरसकट पंचनामे करण्याच्या सूचना केल्या तसेच उचंदा गणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी  सुुुचनेनुसार नायब तहसिलदार प्रदीप झांबरे , कृषि सहाय्यक संदीप पाटील व विनोद पाटील, तलाठी गणेश मराठे, आमदारांचे स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी,शिवसेना माजी उपजिल्हाप्रमुख गोपाळ सोनवणे, शिवसेना  शहर संघटक वसंत भलभले, नगरसेवक संतोष मराठे  आदी  पदाधिकाऱ्यांनी नुकसानीची पाहणी केली. व परिसरात  केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर व  इतर पिकांचे तसेच गाव परिसरात झाडे तुटणे यामुळे घरांची  पडझड , विजेच्या खांबांची, तारांची तसेच असंख्य ठिकाणच्या रोहित्राची (डी पी) प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन 100 % नुकसान झाल्याची तसेच सुदैवाने जीवित हानी टळली असून उचंदे गावात एका शेतकऱ्यांची बैल जोडी मात्र यात ठार झाली आहे अशी पाहनीतील आमदार पाटील यांच्यासह तहसीलदार संचेती  यांना दिली आहे.

वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल शेतातच खराब होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते. यंदा दुष्काळी परिस्थितीवर मात करीत मुक्ताईनगर व रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी केळी लागवड करून आजपर्यंत मोठ्या कष्टाने हे पीक जोपासले आहे. यावर्षी केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळेल या आशेने वर्षभर केलेल्या कष्टाचे फळ समोर दिसत असताना २७ मे २०२१ रोजी दुपारी ३: ३० वाजेच्या सुमारास अचानक वादळाने प्रचंड  थैमान  घातले. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या प्रलयंकारी वादळी वाऱ्याने व मुसलधार पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले केळीचे पीक पूर्णपणे भुईसपाट झाले आहे. याबाबतची माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी कळताच त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील व रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांना भ्रमध्वनिवरून संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली .आणि रावेर च्या तहसिलदार उषाराणी  देवगुणे मुक्ताईनगर च्या तहसिलदार श्वेता संचेती यांना तसेच रावेर व मुक्ताईनगर तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून सूचना देत शुक्रवार सकाळपासून केळी पिकासह इतर पिके तसेच घरांची पडझड याबाबत सरसकट पंचनामे करून शासनाकडे अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

आधी भाव कमी, आता अस्मानी संकटाने घेरले

शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने केळी पिकाची लागवड केली होती. केळीला भाव चांगला मिळेल या आशेने शेतकरी वर्ग आनंदात होते. परंतु, व्यापाऱ्यांकडून लॉकडाऊनचे कारण दाखवत अडवणूक करून कमी भावात मागणी करण्यात येत होती. त्यातच आता वादळी वाऱ्याने केळीचे पीक भुईसपाट झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

वादळी वाऱ्याने वीज खांब वाकले

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात  झालेल्या वादळामुळे शेतशिवार व गावठाणच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने विद्युत खांब वाकून तारा तुटल्या तसेच रोहित्र ही कोलमडून पडलेले असल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात वादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात आज दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांमध्ये शेतीचे नुकसान झाले आहे.याबाबतजी  माहीती आमदार चंद्रकांत पाटील यांनी जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना दिली त्यानुसार सदरील नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी यंत्रणेला दिले आहेत.

 

 

Protected Content