


भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्ती, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या १८ सायकलपटूंनी गुरुवारी पहाटे पंढरपूर वारीसाठी उत्साहात प्रस्थान केले. श्री विठ्ठल मंदिरातून सकाळी सहा वाजता विठ्ठल नामाच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात या सायकलवारीला प्रारंभ झाला. यावेळी असोसिएशनचे पदाधिकारी, धावपटू, महिला धावपटू तसेच सायकलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सायकलवारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या उपक्रमाचा प्रमुख उद्देश पर्यावरण संवर्धन, नियमित व्यायामाचे महत्त्व आणि वारकरी परंपरेतील अध्यात्मिक मूल्ये समाजापर्यंत पोहोचविणे हा आहे. विठ्ठलभक्तीचा संदेश देत आणि “विठ्ठल… विठ्ठल…”च्या जयघोषात सायकलपटूंनी पंढरपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. या सायकलवारीमध्ये सहभागी सायकलपटू सुमारे ४३० किलोमीटरचा प्रवास तीन दिवसांत पूर्ण करणार आहेत. मार्गात दोन ठिकाणी मुक्काम करण्यात येणार असून दररोज सुमारे १७० किलोमीटरचे अंतर सायकलवरून पार केले जाणार आहे. नियोजनानुसार हे सर्व सायकलवारकरी शनिवारी पंढरपूर येथे पोहोचतील. त्यानंतर राज्याच्या विविध भागांतून आलेल्या सायकलवारकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील प्रसिद्ध रिंगण सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
सायकलवारीचा शुभारंभ असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण फालक तसेच विश्वस्त सचिन अग्रवाल, प्रवीण वारके आणि प्रवीण पाटील यांच्या हस्ते असोसिएशनचा ध्वज दाखवून करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी सर्व सायकलवारकऱ्यांना सुरक्षित, यशस्वी आणि मंगलमय वारीसाठी शुभेच्छा दिल्या. या उपक्रमामुळे युवकांमध्ये सायकलिंग, आरोग्यदायी जीवनशैली आणि पर्यावरण संरक्षणाबाबत सकारात्मक जनजागृती होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. यंदाच्या सायकलवारीत प्रवीण फालक, जगदीश रेहपाडे, युवराज सूर्यवंशी, विश्वनाथ पावरा, अरुण शिंदे, भाऊसाहेब पाटील, मनोज चौधरी, तुषार पोतरवार, गजानन पाटील, अनंता पाटील, मधुकर इंगळे, विद्याधर इंगळे, समीर चौधरी, डॉ. राहुल भोईटे, मनोहर पाटील, सचिन काळे, केतन बुचडे आणि विनय बडगुजर या १८ सायकलपटूंचा सहभाग आहे.



