
मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गट व गणांची आरक्षण सोडत आज सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली. दुपारी बारा वाजता पार पडलेल्या या सोडतीत एकूण तीन गट आणि सहा गणांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडल्याने उपस्थित नागरिक आणि प्रतिनिधींनी समाधान व्यक्त केले.
या सोडतीनुसार अंतुर्ली गट अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला असून अंतुर्ली गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. उचंदे गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला ठेवण्यात आला आहे. तसेच हरताळे गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असूनहरताळे व रुईखेडा गण सर्वसाधारण (महिला) प्रवर्गासाठी निश्चित झाले आहेत.
याशिवाय कुऱ्हा गट अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्याचप्रमाणे कुऱ्हा गण अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव ठरला आहे, तर वाढोदे गण अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आला आहे. या सोडतीमुळे विविध सामाजिक घटकांना प्रतिनिधित्व मिळाले असून सर्वसमावेशक आरक्षण रचना निर्माण झाल्याचे प्रशासनाने नमूद केले.
आरक्षण जाहीर होताच स्थानिक राजकीय समीकरणांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. विविध राजकीय पक्षांनी संभाव्य उमेदवारांचा विचार सुरू केला असून आगामी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीचा रंग अधिक गडद होत असल्याने मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.



