छुप्या युतीचा आरोप आणि गिरीशभाऊंनी घेतली आ. चंद्रकांत पाटील यांची उघडपणे भेट !

मुक्ताईनगर, पंकज कपले | एकीकडे एकनाथराव खडसे हे आमदार चंद्रकांत पाटलांवर टिकेची झोड उठवत असतांना आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी मुक्ताईनगरात आमदार पाटलांची भेट घेऊन बंदद्वार चर्चा केल्याने राजकीय वर्तुळाचे कुतुहल चाळविले आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार रोहिणी खडसे यांच्या पराभवाला आमदार गिरीश महाजन आणि त्यांचे समर्थक कारणीभूत असल्याचा आरोप एकनाथराव खडसे यांनी आधी अनेकदा केला आहे. गिरीशभाऊंचे कट्टर समर्थक तथा माजी जि.प. उपाध्यक्ष नंदू महाजन यांनी विरोधात काम करून रोहिणीताईंच्या पराभवात मोठी भूमिका पार पाडल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यातूनच पक्षांतर करून एकनाथराव खडसे हे आता राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. खडसेंनी कालच जिल्ह्यात शिवसेना व भाजपची छुपी युती असल्याचा आरोप केला होता. यानंतर, कोचूर येथील कार्यक्रमात त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार साहेब यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप केला. यानंतर आज सायंकाळी मुक्ताईनगरात थेट माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

आमदार चंद्रकांत पाटील आणि नंदू महाजन यांनी आज मुक्ताईनगरा आ. चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. याप्रसंगी झालेल्या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी खडसेंनी केलेली टीका आणि महाजन व पाटील यांची झालेली भेट यांच्यातील टायमिंग हे राजकीय वर्तुळात चर्चेला निमंत्रण देणारे ठरले आहे.

नाथाभाऊंनी अलीकडच्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या युतीवर अनेकदा भाष्य केले आहे. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीत या दोन्ही पक्षांनी छुपी युती केल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. तर याच निवडणुकीच्या प्रचारात आमदार गिरीश महाजन यांनी आमचे चंद्रकांतभाऊ असा केलेला उल्लेख देखील राजकीय वर्तुळात चांगलाच गाजला होता. यानंतर आज त्यांनी थेट चंद्रकांत पाटील यांची घेतलेली भेट ही याचमुळे आता चर्चेचा विषय झालेली आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!
%d bloggers like this: