फुकटयांच्या विरोधात महावितरण आक्रमक; चार दिवसात ९०० जणांना दिला दणका  

बुलडाणा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महावितरणच्या वीज वाहिन्यांवर आकडे टाकून फुकटात वीज वापरणाऱ्यांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली आहे.मागील चार दिवसात अकोला परिमंडळात ८९८ जणांवर कारवाई करून वीज वितरण यंत्रणेवर असलेला अतीरिक्त १४.२६ मेगावॅट जोडभार कमी झाला आहे.

महावितरणच्या वीज वाहिन्यांवर आकडे टाकून फुकटात वीज वापरत असल्याने उन्हाळ्यात वीज यंत्रणेवरील दबाव वाढला आहे. आकडे टाकून अवैध पुणे वीज घेत असल्याने प्रामाणिक वीज ग्राहकांना याचा फटका बसत होता.

महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, मागील चार दिवसात अकोला जिल्ह्यातील एकूण २७६, बुलढाणा जिल्ह्यातील ५९१ आणि वाशिम जिल्ह्यातील ३१ आकडे टाकून वीज वापरणाऱ्या फुकटयांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

एकट्या बुलढाणा जिल्ह्यात ५९१ जणांवर कारवाई केल्याने जिल्ह्यातील वीज यंत्रणेवर असलेला अतीरिक्त ११.१२ मेगावॉटचा जोडभार कमी झाला आहे.मलकापूर विभागात २२५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील जोडभार यामुळे २.४९ मेगावॉटने कमी झाला आहे. वीज यंत्रणेवर असलेला अतीरिक्त जोडभार कमी करण्यासाठी महावितरणाकडून राज्यात सर्वदूर ही मोहीम राबविण्यात येत आहे.

आकडे टाकून वीज चोरी करणे हे बेकायदेशीर कृत्य आहे. गुन्हा सिद्ध झाला तर कठोर कारावासाची तरतूद कायद्यात करण्यात आली.राज्यात अनेक ठिकाणी गुन्हा सिद्ध झाल्यावर आरोपींना शिक्षा झाली आहे.याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे.

Protected Content