गुप्तेश्‍वरी नट्या व गुप्तेश्‍वर कोणते प्रायश्‍चित्त घेणार- शिवसेनेचा सवाल

मुंबई । महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्‍वरी नट्या आणि गुप्तेश्‍वर आता कोणते प्रायश्‍चित्त घेणार आहेत? असा प्रश्‍न विचारत हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणार्‍यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

सविस्तर वृत्त सोबतच्या लिंकवर क्लिक करून वाचा

शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आज सुशांत प्रकरणात समोर आलेल्या सत्याबाबत भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने गळफास घेऊन आत्महत्याच केली. त्याचा खून वगैरे झाला नाही असे सत्य पुराव्यासह एम्सचे डॉ. सुधीर गुप्ता यांनी समोर आणले आहे. सुशांत राजपूतच्या दुर्दैवी मृत्यूस ११० दिवस झाले. या काळात मुंबई पोलिसांची ज्यांनी यथेच्छ बदनामी केली, मुंबई पोलिसांच्या तपासावर ज्यांनी रोज प्रश्‍नचिन्ह निर्माण केले, त्या राजकीय पुढाऱयांनी, कुत्र्यासारख्या भुंकणाऱया गलिच्छ वृत्तवाहिन्यांनी महाराष्ट्राची माफीच मागायला हवी. या सगळयांनी महाराष्ट्राच्या प्रतिमेस ठरवून कलंक लावण्याचा प्रयत्न केला. हे एक कटकारस्थानच होते.

यात पुढे म्हटले आहे की, सुशांत हा एक चारित्र्यहीन, उडाणटप्पू तरुण कलाकार असल्याचे चित्र सीबीआय तपासानंतर बाहेर पडले. सुशांत प्रकरणाचे भांडवल करून महाविकास आघाडीचे सरकार व मुंबई पोलिसांची मीडिया ट्रायल केली! स्वतःच पत्रकारितेतील हरिश्‍चंद्राचा अवतार समजणारे प्रत्यक्षात हरामखोर, बेइमानच निपजले! त्या बेइमानांच्या विरोधात मराठी जनतेने ठाम भूमिका घेतलीच पाहिजे. अनेक गुप्तेश्‍वर आले गेले, पण मुंबई पोलिसांच्या प्रतिष्ठेचा झेंडा कायम फडकत राहिला.

यात शेवटी नमूद केले आहे की, सुशांतच्या मृत्यूचे ज्यांनी भांडवल केले, मुंबईला पाकिस्तानची, बाबराची उपमा दिली त्या नटीबाई आता कोणत्या बिळात लपल्या आहेत? हाथरसमध्ये एका तरुण मुलीवर बलात्कार करून मारले, तेथील पोलिसांनी त्या मुलीचा देह विटंबना करून काळोखात जाळला याबद्दल त्या नटीने डोळ्यात ग्लिसरीन घालूनसुद्धा दोन अश्रू ढाळले नाहीत. ज्यांनी त्या मुलीवर बलात्कार केला ते या नटीबाईचे भाईबंद आहेत का? ज्या पोलिसांनी त्या मुलीस जाळले ते पोलीस त्या नटीबाईचे घरगडी आहेत काय?

ज्यांनी मागच्या शंभर दिवसांत महाराष्ट्राची, मुंबई पोलिसांची यथेच्छ बदनामी केली, अशा गुप्तेश्‍वरी नट्या आणि गुप्तेश्‍वर आता कोणते प्रायश्‍चित्त घेणार आहेत? जे महाराष्ट्राच्या, मराठी माणसाच्या वाटेला गेले, त्यांचे साफ वाटोळे होते. बेइमान, हरामखोरांनी हे आता तरी समजून घ्यावे. हाथरस बलात्कार प्रकरणात शेपूट घालून बसणार्‍यांनी महाराष्ट्राच्या मर्दानगीची परीक्षा घेऊ नये असा इशारा यात देण्यात आला आहे.

Protected Content