दुभाजकावर आदळून मोटारसायकलस्वाराचा मृत्यू : महापालिकेसमोर दुर्घटना

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील महानगरपालिकेसमोर असलेल्या डिव्हायडरवर दुचाकी आदळल्याने दुचाकीस्वराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मिलिंद सोमनाथ पवार (वय-४६, रा. शाहूनगर,जळगाव) हे जळगाव शहरातील गोविंदा रिक्षा स्टॉप जवळील जे.के. पानसेंटर कामाला होते. दरम्यान आज मंगळवारी २० जून रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास मिलिंद पवार हे दुचाकीने टॉवर चौककडून नेहरू पुतळ्याकडे जात असताना अचानक त्यांचा एका अज्ञात दुचाकीने कट मारला. यात त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने डिव्हायडर वरील इलेक्ट्रिक डीपीच्या पोलवर आढळली. या अपघातात इलेक्ट्रिक डीपीचा लोखंडी खटक्याचा फटका बसल्याने त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताच्या ठिकाणीच त्यांच्या मागे असलेल्या पोलिसांच्या चार्ली पथकातील चारुदत्त पाटील आणि भरत पाटील यांनी यांच्यासमोर घटना घडल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली. दरम्यान खाजगी वाहनाने मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती.

मयत मिलिंद पवार यांच्या पश्चात आई सिंधूबाई, वडील सोमनाथ पवार, भाऊ मनोज व किशोर, पत्नी सुनंदा आणि तीन मुली असा परिवार आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तेव्हा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.

Protected Content