अमळनेर तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींचे आर. ओ. प्लांट नादुरुस्त! : खासगी व्यवसाय तेजीत

अमळनेर- गजानन पाटील | तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीचे आर.ओ. फिल्टर प्लांट नादुरूस्त असल्याने ग्रामस्थांची कुचंबणा होत असून कडाक्याच्या उन्हाळ्यात त्यांना खासगी व्यावसायिकांकडून चढ्या दराने पाणी घ्यावे लागत आहे.

एकीकडे उन्हाळा अधिक तीव्र होत असतानाच घशाला कोरड पडत आहे; तर दुसरीकडे तापमानाचा पारा उंचावल्यामुळे पाणी बॉटल तसेच शीतपेय यांना अधिकची मागणी वाढली आहे.सद्यस्थितीत मे हिटचा तडाखा चांगलाच बसत असून जीवाला गारवा मिळेल असे गार पाणी अमळनेर तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत मधील नादुरुस्त असलेले आर ओ प्लांट(अक्वा वॉटर)मुळे हद्दपार होताना दिसून येत आहे. याचे कारण प्रत्येक ग्राम पंचायत ची स्थानिक ठिकाणी याबद्दल उदासीनता दिसून येत आहे.परिणामी,याउलट खाजगी पाण्याचा व्यवसाय सद्या तेजीत आला आहे.

तालुक्यात १० रु किमतीचा पाण्याचा जार आता २०-२५ तर काही ठिकाणी ३० रु दराने घ्यावा लागत आहे. यामुळे सर्व सामान्य जनतेला आथिर्क भुर्दंडचा सामना करावा लागत आहे. अग्नी,हवा,ऊन पाणी वारा यावर मानवाचा समान अधिकार आहे. आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.तेंव्हा ते प्रत्येकाला मिळालेच पाहिजे!एकीकडे शासनाने ग्राम पातळीवर लाखो,कोट्यवधी रुपये निधी खर्च करून आर. ओ. प्लांट देऊ केले आहेत. मात्र याची पाहिजे तशी पूर्तता होताना दिसत नाही.आजच्या स्थितीत संपूर्ण तालुक्यातील गावांचा सर्व्हे केला तर दहा वीस टक्केच ग्राम पंचायतीत आर. ओ. प्लांट असतील.

आज जवळपास जलजीवन मिशन अंतर्गत शासनाने राहिलेल्या ठिकाणी आर ओ प्लांट सहित पाणी पुरवठा योजना देऊ केल्या आहेत. परंतु याची ठोस अंमलबजावणी होताना दिसून येत नाही!अमळनेर तालुक्यात बहुतेक ठिकाणी हे प्लांट तर आहेत;परंतु कुठे सुरू,कुठे बंद तर कुठे सुरु होण्यापूर्वीच नादुरुस्त तर काही ठिकाणी सुरू होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.ना नफा,ना तोटाया तत्त्वावर सुरू असलेली आर ओ प्लांटचे आज व्यवसायिकीकरण होताना दिसून येत आहे. यामुळे साहजिकच खाजगी पाण्याचा व्यवसाय तेजीत येऊन सर्वसामान्य जनतेला आर्थिक संकटांस तोंड द्यावे लागत आहे.

अमळनेर तालुक्यातील बहुतांश ठिकाणी बंद व नादुरुस्त असलेली ग्राम पंचायतची आरओ प्लांट खालील प्रमाणे!

१)भोरटेक – सुरू होण्याचा प्रतिक्षेत
२)धार-शून्य
३)मारवड- गेल्या चार पाच दिवसापासून बंद
४)गोवर्धन-पाण्याची अडचणी मुळे याठिकाणी देखील काही दिवसांपासून बंद
५)डांगरी-या गावी काही दिवस सुरु होते.मात्र आज तागायत बंदच
६)कळमसरे-नादुरुस्त-याठिकाणी महिन्यातून दोन ते तीन वेळा तांत्रिक अडचणीमुळे बंदच आढळून येतो.
७)वासरे-याठिकाणी वासरे खेडी खरदे अशी तीन गावे मिळून ग्रुप ग्राम पंचायत आहे. या गावात काही महिन्यांपूर्वीच आर ओ फिल्टर्स प्लांट मिळालेला आहे; परंतु हा देखील आजच्या घडीला नादुरुस्त च्या घटिका मोजतो आहे.
८)नीम-याठिकाणी तर हद्दच झालेली आहे. माजी आ.शिरीष चौधरी यांचा कार्यकाळात दिला गेलेला फिल्टर प्लांट सुरुवातीचे दोन वर्षे त्यांच्याच कार्यकर्त्यास कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने दिले गेल्याची चर्चा आहे.आणि एवढीच नाही तर त्या बहाद्दराने नादुरुस्त होताच ग्रा.पंचायत च्या स्वाधीन करून पळ काढल्याचे बोललं जातंय.त्यामुळे आजच्या स्थितीत येथील फिल्टर प्लांट देखील नादुरुस्तच आहे.

दरम्यान अमळनेर तालुक्यात आजच्या घडीला सर्वत्र हीच परिस्थिती असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात ग्राम पंचायतच्या उदासीन धोरणामुळे हक्काच्या शीतल पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

Protected Content