कंडारी येथील विद्यार्थ्यांचा पाठ्यपुस्तकातील कवींशी मोबाईलद्वारे संवाद 

WhatsApp Image 2019 11 29 at 20.07.48

भुसावळ, प्रतिनिधी | शालेय पाठ्यपुस्तकातील कवितेची रचना करणार्‍या कवीशी थेट मोबाईलद्वारे संवाद साधून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी कवितेची पार्श्‍वभूमी समजावून घेऊन कवी व कवितेसंदर्भातील सविस्तर माहिती घेतली. गोधडी कवितेचे कवी डॉ. कैलास दौंड यांच्याशी मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांनी हा संवाद साधला.

डॉ.  कैलास दौंड यांनी कृतज्ञता हा आपला अंगभूत गुण बनायला हवा, असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. पाठ्यपुस्तकातील पाठ व कवितांचे लेखक अथवा कवी यांच्याबद्दल जाणून घेण्याची विद्यार्थ्यांची उत्सुकता असते. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे येथील मराठी विषयाचे अभ्यास गट सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्याशी मोबाईलद्वारे थेट संवाद साधला. जळगाव तालुक्यातील कंडारी येथील जिल्हा परिषद मराठी शाळेतील इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला. यावेळी संतोष वानखेडे, रमेश सूर्यवंशी, रमाकांत तायडे, गणेश तांबे, विनोद जयकर, सुनंदा भारूडे, सविता निंभोरे, मंजूषा पाठक, ज्योती वाघ आदी शिक्षकांची उपस्थिती होती.इयत्ता आठवीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या गोधडी या कवितेचे कवी डॉ. कैलास दौंड आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील रहिवाशी असलेले डॉ. दौंड प्रथितयश साहित्यिक असून पेशाने शिक्षक आहेत. त्यांच्याशी डॉ. जगदीश पाटील यांनी मोबाईलद्वारे कॉल करून व मोबाईल ब्ल्यूटूथशी जोडून हा आवाज वर्गभर पुरेल अशा पद्धतीने रचना केली. त्यानंतर तब्बल अर्धा तास डॉ. दौंड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कवितेची प्रेरणा, आई, कवितेचा भावार्थ, गाव व शहर यातील अंतर, गोधडीचे भवितव्य यासह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्‍नांना डॉ. दौंड यांनी मनमोकळेपणाने उत्तरे दिली. यावेळी त्यांनी स्वरचित ढव व माय ऊनपावसाची अशा दोन कविता आणि आवडते कवी नारायण सुर्वे यांची ना घर होते ना दार होते ही कविता म्हटली. शेवटी विद्यार्थ्यांना संदेश देतांना ते म्हणाले की, आपल्या आईवडिलांना विसरू नका. शिक्षकांविषयी आदर बाळगा. देशभक्ती कायम मनात ठेवा. या सर्वांविषयी कृतज्ञता मनात ठेवा. जीवन जगत असतांना पावलोपावली आपल्याला इतरांची मदत मिळत असते. त्यामुळे त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे. कारण कृतज्ञता दाखवल्याने शारीरिक, मानसिक आणि भावनिक लाभ मिळून सकारात्मकता वाढते. कृतज्ञतेच्या जाणिवेमुळे नकारात्मक विचार व भावनांवर सहज मात करता येते. आपल्या प्रत्येकात कृतज्ञता हा अंगभूत गुण बनायला हवा, असे मार्गदर्शनपर डॉ. दौंड यांनी मोबाईलद्वारे केले. मोबाईलद्वारे थेट साहित्यिकाशी संवाद साधण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content