मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेली मागणी मान्य झाली असून, यामुळे तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे अद्याप पीक विमा भरू न शकलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखल करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. यासंदर्भात त्यांनी २८ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या.

अनेक शेतकऱ्यांच्या ई-पीक पाहणीतील नोंदी सातबारा उताऱ्यावर प्रतिबिंबित झालेल्या नसणे, सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध न होणे तसेच सीएससी केंद्रांवरील तांत्रिक व प्रशासकीय अडचणींमुळे पीक विमा अर्ज भरण्यात अडथळे निर्माण होत होते. त्यामुळे पात्र असूनही अनेक शेतकरी पीक विमा संरक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती.
याच पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत पाटील यांनी पीक विमा भरण्याची अंतिम मुदत किमान १५ दिवसांनी वाढवावी, ई-पीक पाहणीतील प्रलंबित नोंदी तातडीने अद्ययावत कराव्यात, सातबारा उतारे ऑनलाइन उपलब्ध करून द्यावेत आणि अर्ज प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संबंधित विभागांना सूचना द्याव्यात, अशी मागणी केली होती. ही मागणी आता मान्य करण्यात आलेली असून १५ नोव्हेंबर पर्यंत पीक विमा अर्ज भरता येणार आहे.
आता पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ देण्याचा निर्णय झाल्यामुळे अर्ज भरण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर खरीप २०२६ व रब्बी २०२६-२७ साठी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू असल्याची नोंदही उपलब्ध आहे.
अनियमित पर्जन्यमान, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पीक विमा हा महत्त्वाचा आधार आहे. त्यामुळे केवळ ऑनलाइन प्रणालीतील अथवा प्रशासकीय अडचणींमुळे कोणताही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहू नये, अशी भूमिका आ. चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पत्रातून मांडली होती.
अखेर त्यांच्या मागणीनंतर पीक विमा अर्जासाठी मुदतवाढ मिळाल्याने मुक्ताईनगरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीत आपले अर्ज पूर्ण करून घ्यावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.



