वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वरणगाव शहरासह परिसरात रेशनमधील तांदळाचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असून याकडे पुरवठा विभाग आर्थिक हितसंबंधांमुळे डोळेझाक करत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी आता होत
–शासनाकडून गोरगरीब,गरजू आणि सर्वसामान्य कुटुंबांना दोन वेळचे पोट भरता यावे,यासाठी मोफत रेशन धान्य उपलब्ध करून दिले जाते. मात्र,याच गरीब जनतेच्या हक्काच्या धान्यावर काहींची वक्रदृष्टी पडत असेल,तर ही केवळ धान्याची अफरातफर नसून गरिबांच्या हक्कावर घातलेला दरोडाच म्हणावा लागेल.
वरणगाव शहरासह परिसरात रेशनच्या तांदळाच्या कथित काळ्या बाजाराबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.गरिबांच्या हक्काचे धान्य नेमके कुठे जाते? लाभार्थ्यांपर्यंत पूर्ण धान्य पोहोचते का? रेशनचा तांदूळ खुल्या बाजारात विक्रीसाठी जात असेल,तर त्यामागे नेमकी कोणती साखळी कार्यरत आहे? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची वेळ आली आहे.

रेशन माफियांची मुजोरी नेमकी कोणाच्या बळावर?
रेशन धान्याची वाहतूक,साठवणूक आणि विक्री यामध्ये काही गैरप्रकार होत असतील,तर त्याकडे पुरवठा विभागाचे लक्ष का जात नाही? धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांना कोणाचे अभय आहे? या संपूर्ण व्यवहारात काही आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का? असे गंभीर प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत.
मात्र,केवळ संशय आणि चर्चांवर विषय थांबता कामा नये.धान्य वितरणाच्या नोंदी,ई-पॉस व्यवहार,प्रत्यक्ष साठा,वाहतुकीची माहिती आणि लाभार्थ्यांना झालेल्या वितरणाची तपासणी झाली, तर वस्तुस्थिती समोर येऊ शकते.
हा खाटिक नामक सूत्रधार कोण ?
या संपूर्ण प्रकरणात वरणगाव शहरात ‘खाटिक’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीचे नाव नागरिकांमध्ये चर्चिले जात असल्याची माहिती समोर येत आहे.या व्यक्तीचा रेशन तांदळाच्या कथित व्यवहाराशी काही संबंध आहे का,याची अधिकृत चौकशी होणे गरजेचे आहे. नागरिकांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार,वरणगाव परिसरातील विविध खेडे-पाड्यांमधून मालवाहू रिक्षांद्वारे दररोज तांदूळ जमा केला जात असल्याचे सांगितले जात आहे.विशेष म्हणजे,हा तांदूळ पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथे पाठविला जात असल्याचीही चर्चा आहे. विशेष बाब म्हणजे अलीकडेच या राईस मीलची तपासणी देखील करण्यात आली होती.
जर या चर्चेत तथ्य असेल,तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. गावागावांतून तांदूळ गोळा करण्यापासून ते त्याची वाहतूक आणि राईस मिलपर्यंत पोहोचविण्यापर्यंत नेमकी कोणती यंत्रणा कार्यरत आहे? या व्यवहाराचा सूत्रधार कोण? धान्याचा मूळ स्रोत काय? आणि या व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे आवश्यक आहे.
गावागावांतून तांदूळ जमा होतो,प्रशासनाला भनकही नाही?
मालवाहू रिक्षांमधून नियमितपणे तांदळाची वाहतूक होत असल्याची चर्चा असेल,तर संबंधित विभागाने याची दखल घेणे आवश्यक आहे.वरखेडी येथील संबंधित राईस मिलमध्ये धान्य कुठून येते,त्याची खरेदी-विक्री कोणाकडून होते आणि त्यासंबंधी नोंदी काय आहेत,याची तपासणी होणे आवश्यक आहे.
महसूल आणि पुरवठा विभाग झोपेतून जागा होणार का?
रेशन धान्याचा काळाबाजार रोखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेची आहे. मग वरणगाव शहरासह परिसरातील रेशन दुकानांची अचानक तपासणी का होऊ नये? संशयास्पद धान्य वाहतुकीवर लक्ष का ठेवले जाऊ नये? संबंधित राईस मिलच्या धान्य साठ्याची आणि खरेदी-विक्रीच्या नोंदींची तपासणी का होऊ नये?केवळ रेशन दुकानांपुरती चौकशी मर्यादित न ठेवता संपूर्ण पुरवठा साखळीचा तपास झाला पाहिजे.दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
प्रशासनाने आता केवळ कागदी घोडे नाचवू नयेत,तर प्रत्यक्ष कारवाई करून दाखवावी.रेशन माफियांच्या कथित साखळीचा तपास करून त्यामागील सूत्रधार कोण आहेत,हे जनतेसमोर यायला हवे.अशीही मागणी नागरिकांनमध्ये होत आहे.
गरीबांच्या हक्काच्या रेशन धान्याचे रक्षण महसूल व पुरवठा विभाग करणार की रेशन माफियांच्या कथित गैरव्यवहारांवर डोळेझाकच सुरू राहणार? अशी चर्चा जनतेत सुरू आहे.



