आदिवासी वस्तीगृहाला आ. अमोल जावळे यांची अचानक भेट

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल-रावेर विधानसभा क्षेत्राचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांनी आज अचानक यावल शहरातील एकात्मिक आदिवासी प्रकल्प विकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या आदिवासी शासकीय मुला-मुलींच्या वस्तीगृहाला भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच वस्तीगृहाच्या स्थितीची सविस्तर माहिती घेतली.

आमदार जावळे यांनी वस्तीगृहात मुलांना मिळणाऱ्या सुविधा, अडचणी आणि गैरसोयी यांची पाहणी केली. विशेषतः मुलांच्या वस्तीगृहात असलेल्या तांत्रिक आणि व्यवस्थापकीय त्रुटींवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी चर्चा करत, वस्तीगृहाच्या गैरसोयींकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ नोटीस पाठवण्याच्या सूचना दिल्या.

या भेटीदरम्यान भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश फेगडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सविता भालेराव, यावल खरेदी-विक्री संघाचे संचालक अतुल भालेराव, युवा मोर्चाचे भुषण फेगडे, पराग सराफ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या दौऱ्यात आमदार अमोल जावळे यांनी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा सुधारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाला निर्देश दिले की वस्तीगृहातील विद्यार्थी कोणत्याही प्रकारच्या गैरसोयींना बळी पडू नयेत आणि त्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.

Protected Content