आई हेच माझे दैवत ! : ना. संजय सावकारे यांचे भावनिक उदगार

भुसावळ – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सर्वसामान्य परिस्थितीतून पुढे येत माझ्या शिक्षिका असलेल्या आईने मला घडवले, आणि त्याच संस्कारांमुळेच मी आज यशस्वी राजकारण करू शकत आहे. माझ्यासाठी आई हेच दैवत आहे, त्यामुळेच आमच्या घराला मी “आई” हे नाव दिले आहे, असे भावनिक वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांनी केले.

भुसावळ येथील आयएमए शाखेतर्फे आयोजित संगीत रजनी आणि सत्कार समारंभात ते बोलत होते. भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी ना. संजय सावकारे आणि त्यांच्या पत्नी सौ. रजनी सावकारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर ज्येष्ठ डॉ. सुरेंद्र भिरुड, डॉ. छाया चौधरी, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्ष रजनी सावकारे, आयएमए अध्यक्ष डॉ. विकास कोळंबे, सचिव डॉ. चेतन ढाके, खजिनदार डॉ. अनंत बेंडाळे यांची उपस्थिती होती.

सावकारे पुढे म्हणाले, “सन 2014 पासून भारताच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. सुशिक्षित मतदार मोठ्या प्रमाणावर मतदान करत आहेत, मात्र त्यापलीकडे जाऊन त्यांनी सक्रिय राजकारणातही सहभाग घ्यावा. त्यासाठी आम्ही मदत करणार आहोत.”

कार्यक्रमादरम्यान, “मुसाफिर हो यारो ना घर है ना ठिकाना…” हे गाणे गात भाऊंनी उपस्थितांची मने जिंकली. त्यानंतर सावकारे दाम्पत्याने “किसी राह पर किसी मोड पर…” हे गाणे सादर करत संपूर्ण सभागृहाला भावनिक केले. यानंतर आयएमए डॉक्टर मंडळींनीही समूहगान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल चौधरी आणि डॉ. आरती चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नितू पाटील यांनी व्यक्त केले. यानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम पार पडला. या समारंभाला भुसावळ शहरातील अनेक आयएमए डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content