आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेला भरभरून प्रतिसाद

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या संकल्पनेतून आणि सूचनेवरून गावपातळीवर विविध प्रकारचे दाखले, योजना व प्रमाणपत्रे नागरिकांना सहज उपलब्ध व्हावीत यासाठी महसूल प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दाखले वाटप शिबीरांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

ग्रामीण भागातील नागरिकांना कार्यालयीन धावपळ न करता आपल्या गावातच शासकीय सेवा मिळावी, हा या शिबीर मागचा उद्देश असल्याचे दिसून येत आहे.

यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात हे शिबीर मंडळस्तरावर आयोजित करण्यात येत असून, त्याअंतर्गत आज रावेर तालुक्यातील मौजे केऱ्हाळे बु. येथे संजय गांधी योजना संदर्भात विशेष शिबीर घेण्यात आले. या शिबीराला महिला भगिनींचा विशेष सहभाग दिसून आला. केऱ्हाळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद दिला. शिबीरामध्ये एकूण १७४ लाभार्थ्यांचे आधार व्हेरिफिकेशन यशस्वीपणे पूर्ण करण्यात आले.

या उपक्रमासाठी गावकऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले असून, गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रभाकर पाटील यांनी स्वतःची जागा उपलब्ध करून देत शिबीर यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले. यामुळे ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण असून, शासनाच्या सेवा प्रत्यक्ष गावात मिळत असल्याने नागरिकांचे श्रम व वेळ वाचत आहे.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याच्या उद्देशाने आमदार अमोल जावळे यांनी दाखले वाटप शिबीरांची संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेला महसूल प्रशासनाचे भरपूर सहकार्य लाभत असून, यावल आणि रावेर तालुक्यांत या शिबीरांच्या माध्यमातून गावोगावी शासकीय सेवा पोहोचवण्याचे काम प्रभावीपणे सुरू आहे.

हा उपक्रम मतदारसंघातील नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरत असून, गावपातळीवरच दाखले मिळाल्यामुळे अनेकांचे अडथळे दूर झाले आहेत. शासकीय सेवांमध्ये पारदर्शकता आणि तत्परता आणणाऱ्या या शिबीरांचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.