ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे – मुख्य अभियंता राजेश नाईक

बुलडाणा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्याच्या कडाक्यात ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरण यंत्रणा पूर्ण क्षमतेने काम करत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उपविभागनिहाय देखभाल-दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. याचदरम्यान वीजबिल वसुलीवर परिणाम झाल्याचे स्पष्ट करत, ग्राहकांनी वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

वाढत्या तापमानामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना अखंड वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणने विविध तांत्रिक उपाययोजना राबविल्या आहेत. वीज पुरवठा सुरळीत व सुरक्षित राहावा म्हणून वीज खांब व तारांचे मजबुतीकरण, तारा बदलणे, झोल काढणे, फिडर पिलरमध्ये इन्शुलेशन स्प्रे, पाणी साचणाऱ्या ठिकाणी फिडर पिलरची उंची वाढवणे, रोहित्रांचे अर्थिंग तपासणे, ऑईल फिल्टरेशन, ब्रेकर व बॅटरी चार्जिंग, फ्यूज बदलणे आदी कामे सुरू आहेत. मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी या कामांची प्रत्यक्ष पाहणी करत प्रत्येक उपकेंद्राच्या देखभालीचा आढावा घेतला आहे.

दरम्यान, महावितरणच्या तांत्रिक कर्मचाऱ्यांची सर्व ऊर्जा ही देखभाल-दुरुस्तीत गुंतल्यामुळे वीजबिल वसुलीवर परिणाम झाला आहे. परिमंडळाअंतर्गत मे महिन्यात १५२ कोटी रूपयांची वसुली अपेक्षित असताना, आतापर्यंत केवळ ३९ कोटी रूपयांचीच वसुली झाली आहे. यामुळे येत्या १७ दिवसांत अकोला जिल्ह्यातून ४९ कोटी, बुलडाणा जिल्ह्यातून ४४ कोटी व वाशिम जिल्ह्यातून २० कोटी रूपयांची वसुली करणे आवश्यक आहे. त्यामुळे वीजबिल भरण्यावर भर देत नागरिकांनी सहकार्य करावे, असे स्पष्ट निर्देश मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिले आहेत.

महावितरण ग्राहकांना अखंड व सुरक्षित वीज पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून नियमितपणे वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता नाईक यांनी पुन्हा एकदा केले आहे.